सांगरूळच्या चंदू पेंटर यांचा प्रबोधनात्मक उपक्रम
सांगरूळ / वार्ताहर
सध्या कोरोना विषाणूचा संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी शासन व सेवाभावी संस्थान मार्फत विविध माध्यमातून समाजप्रबोधनाची उपक्रम राबवले जात आहेत.करवीर तालुक्यातील सांगरुळ येथील चंद्रकांत कल्लाप्पा जंगम उर्फ चंदू पेंटर यांनी दहा फूट उंच यमाची रेड्यावर बसलेली प्रतिकृती तयार करून कोरोना प्रतिबंधाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
सांगरूळ परिसरात हा कुतुहलाचा विषय बनला आहे. मास्क वापरा, हात धुवा, महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, असा संदेश देणारी यमाची ही प्रतिकृती आहे. चंद्रकांत जंगम उर्फ चंदू पेंटर यांनी शासनाचा संदेश यातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
चंद्रकांत जंगम यांना बालपणापासूनच चित्रकला व शिल्पकला यांची आवड होती. सांगवीचे ज्येष्ठ शिल्पकार स्व. गणपतराव जाधव गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण घेतले. आपल्या उत्कृष्ट कलेच्या माध्यमातून त्यांनी शासनाच्या विविध उपक्रमाचे प्रतिकृतीच्या माध्यमातून समाजापर्यंत संदेश पोचवण्याचा छंद जोपासला आहे. आजपर्यंत व्यसन मुक्ती, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार,पाणी बचाव ,बेटी बचाव, इत्यादी विषयांवर आधारीत भव्य व आकर्षक हलत्या प्रतिकृती तयार करून शासनाचे संदेश आपल्या प्रतीकृतीतून देत त्यांनी समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच यापूर्वी त्यांनी दहा ते वीस फुटा पर्यंत राक्षस, कोंबडा, एलियन,जोकर, कार्टून, ॲनाकोंडा, गोरिला किंग कोंग, फेटेवाला पैलवान, अशा विविध प्रतिकृती तयार केली आहेत. या शिल्पकलेतुन समाजप्रबोधनाचा सहज लोकापर्यंत संदेश पोचवण्याचा पर्याय जंगम यांनी निवडला आहे. व यातून किती फायदा मिळतो याचा विचार न करता समाजामध्ये कसे प्रबोधन करायचे याचा विचार चंद्रकांत जंगम करतात. या व्यतिरिक्त चंदू पेंटर यांनी पीव्हीसी पाईप लाईनचे गळती काढण्याचे तंत्र आत्मसात केले आहे. शेती पाणीपुरवठाच्या पाइपलाइनची गळती दुरुस्तीचे काम ते अल्प मोबदल्यात सेवाभावाच्यावृत्तीने करतात.यामुळे शेतकरी वर्गाला व परिसरातील ग्रामपंचायतींना पाइपलाइनची गळती काढण्यासाठी त्यांचे सहकार्य मिळत आहे.
समाज प्रबोधनातून मानसिक समाधान मिळते
शिल्पकला, मूर्ती बनवणे शिल्पकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे पाइपलाइनची गळती काढणे यातून मिळणाऱ्या मोबदल्यावर उदरनिर्वाह करत आहे.कलेचा वापर समाजप्रबोधनासाठी करत असल्याने समाधान लाभते. माझे गुरु ज्येष्ठ शिल्पकार स्व. गणपतराव जाधव (जाधव गुरुजी ) यांचे कार्याची सातत्याने प्रेरणा मिळत आहे – चंदकांत जंगम