वार्ताहर /बैलहोंगल
सौंदत्ती येथील यल्लमा देवीचे सुमारे अडीच लाखाहून अधिक भाविकांनी बुधवारी दर्शन घेतले. ‘उदे ग आई उदो’ च्या जयघोषात तसेच ढोल-ताशांच्या तालात व भंडाऱयाच्या उधळणीत भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. माही पौर्णिमेनिमित्त डोंगरावर लाखो भाविकांचा जनसागर लोटला होता.
बेळगाव, धारवाड, विजापूर, बागलकोट व महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे येथून भाविकांचे लोंढेच्या लोंढे आल्याने डोंगर परिसर फुलून गेला होता. बेळगाव जिल्हय़ातील भाविकही दुचाकी वाहने, टेम्पो, बैलगाडय़ा आदीने डोंगरावर दाखल झाले होते. त्यामुळे सुमारे दोन कि.मी.पर्यंत गर्दी झाली होती.
जोगुळभावी पुंडात स्नानासाठी गर्दी
यात्रेनिमित्त डोंगराच्या पायथ्याशी भाविकांनी स्नानासाठी एकच गर्दी केली होती. देवीच्या दर्शनानंतर मंदिरापासून 3 कि.मी.वर असलेल्या पारसगड येथील रामलिंग देवस्थानात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तसेच श्रीमौनेश्वर व परशुराम मंदिरातही गर्दी झाली होती.
पडल्या भरण्याचा कार्यक्रम उत्साहात
माही पौर्णिमेच्या दिवशी पडल्या भरण्याचा धार्मिक कार्यक्रम असतो. पुरण पोळय़ा, वाग्यांची भाजी या पदार्थांचा नैवेद्य भाविक देवीला दाखवितात. तसेच या दिवशी जुन्या झालेल्या पडल्या व कवडय़ाची माळ देवीला समर्पित करत नव्याने घेतलेल्या पडल्या व कवडय़ांची पूजा करून पडली भरण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पाडाला जातो. या ठिकाणी गर्दी झाली होती.
वाहतूक विस्कळीत
डोंगरावर बुधवारी हुबळी -धारवाडमार्गे, बागलकोट सौंदत्तीमार्गे व बेळगाव सौंदत्तीमार्गे विविध भागांतून आलेल्या राज्य परिवहन बसेस मिळेल त्या ठिकाणी उभ्या करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती.