वार्ताहर / बाळेकुंद्री
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात मंगळवारी कार्तिकी दीपोत्सव साजरा करण्यात आला.
दीपोत्सव समारंभप्रसंगी देवस्थान कमिटीचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवी कोटारगस्ती म्हणाले, प्रकाश हा जीवनाचे प्रतिक आहे. या उपक्रमद्वारे हजारो दिवे लावून आदीशक्ती देवीच्या कृपाशीर्वादाने कोरोनाचे संकट दूर होऊन अंधःकार दूर होऊ देत, असे सांगितले.
यावेळी दीपोत्सव भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा करण्यात आला. कोरोनामुळे देवीच्या दर्शनाला बंदी असल्याने प्रथमच यंदा साधेपणाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे देवीची पूजा, आरती व धार्मिक कार्यक्रम पार पाडल्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांच्या हस्ते मूर्तीला अभिषेक घालण्यात आला.सायंकाळच्या सुमारास रत्नव्वा आनंद मामनी, अल्लमप्रभू प्रभूनगर, मोदगौड दामनगौड, मल्लय्या तोरगलमठ, पंडित यडूरय्या व यल्लम्मा देवस्थान कमिटीचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी दीपप्रज्वलाने दीपोत्सवाला सुरुवात करण्यात आली. मंदिराच्या प्रांगनात पणत्या लावल्याने मंदिर परिसर प्रकाशाने उजळून निघाला होता. मंदिरामध्ये दिवे लावण्यासाठी महिलांची गर्दी झाली होती. मंदिरच्या परिसरात सुंदर व आकर्षक रांगोळय़ा रेखाटण्यात आल्या होत्या.