देवीचे दर्शन घेण्यासाठी सौंदत्ती डोंगरावर लोटला जनसागर
वार्ताहर / बाळेकुंद्री
कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीचे दर्शन सोमवारी भाविकांना खुले करण्यात आले. सोमवारी सकाळी चिक्कमंगळूर येथील दत्त पीठाचे मठाधीश अशोक गणपती शर्मा गुरुजी, मल्हारी कुलकर्णी, कुमारस्वामी तल्लूरमठ, बेळगाव कपिलेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष सतीश निलजकर, देवस्थानचे कार्यनिर्वाहक अधिकारी रवि कोटारगस्ती, राकेश कलघटगी व मंदिर पुजाऱयांच्या उपस्थितीत देवीची मंगलआरती व धार्मिक विधी आटोपून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.
देवीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांना संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी मंदिर प्रशासनाने घेतली आहे. भाविकांना मास्कचा वापर व सुरक्षित अंतराचे पालन करून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिराचे सीईओ रवि कोटारगस्ती यांनी केले आहे. तब्बल अकरा महिन्यांनी मंदिर खुले करण्यात आल्याने सोमवारी सकाळपासूनच ‘उदे ग आई उदो’च्या गजरात भंडाऱयाच्या उधळणीत यल्लम्मा डोंगरावर भाविकांची गर्दी होती. त्यामुळे डोंगर फुलून गेला होता. देवीच्या दर्शनासाठी तीन ते चार तास रांगेत उभे राहून भाविकांनी दर्शन घेतले.