अन्य सहाजण गंभीर जखमी : देवदर्शनासाठी हुबळी-यल्लापूर मार्गे धर्मस्थळला जाताना अरेबैल घाटात दुर्घटना, जखमींना किम्समध्ये दाखल
प्रतिनिधी / कारवार
बोलेरो आणि दोन लॉरी (यापैकी एक टिप्पर) दरम्यान झालेल्या भीषण अपघातात बोलेरोमधील दोन महिलांचा मृत्यू तर अन्य सहा व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्याची घटना यल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरेबैल घाटात घडली. अपघातात एक महिला जागीच ठार झाली तर अन्य एका महिलेचा यल्लापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
राजेश्वरी परेड्डी (वय 35) आणि चिक्कम्मा पाटील (वय 28 रा. बिदरी, ता. मुधोळ जि. बागलकोट) अशी मयत महिलांची नावे आहेत.
या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी की, नवीन खरेदी केलेल्या बोलेरो वाहनातून बागलकोट जिल्हय़ातील आठ जण देवदर्शनासाठी हुबळी-यल्लापूर मार्गे धर्मस्थळला निघाले होते. बोलेरो वाहन राष्ट्रीय हमरस्ता क्र. 63 वरील अरेबैल घाटात आले असता पाठीमागून येणाऱया लॉरीवरील चालकाचे नियंत्रण चुकले आणि बोलेरोला पाठीमागून जोराची धडक दिली. त्याचवेळी समोरून येणाऱया टिप्परने बोलेरोला जोरची धडक दिली. परिणामी राजेश्वरी ही महिला अपघातस्थळीच ठार झाली. या अपघातात चिक्कम्मा, तिम्मन गौडा, हणुमंत, लक्ष्मी, श्रुती, आकाश आणि अपेक्षा असे एकूण सात जण गंभीररित्या जखमी झाले. जखमी पैकी आकाश आणि अपेक्षा ही अल्पवयीन मुले आहेत. स्थानिकांनी जखमींना बोलेरोतून बाहेर काढले आणि यल्लापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दवाखान्यात उपचारादरम्यान चिक्कम्मा पाटील या महिलेचा मृत्यू
झाला.
काही काळ वाहतूक ठप्प…
गंभीररित्या जखमी झालेल्या त्या सहा जणांना उपचारासाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात नवीन बोलेरोचा चेंदामेंदा झाला. अपघातामुळे हुबळी-अंकोला राष्ट्रीय हमरस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यल्लापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश येळ्ळूर आणि उपनिरीक्षक मंजुनाथ गौडा यांनी अपघातस्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. यल्लापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.