प्रतिनिधी /सातारा :
कासकडे जाणाऱया रस्त्यावरील यवतेश्वर घाटात बुधवारी रात्री बिबटय़ाचे दर्शन झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे. रात्रीच्या सुमारास या मार्गावरून प्रवास करणाऱया नागरिकांना बिबटय़ाचे दर्शन झाले. रात्रीच्या सुमारास घाटात बिबटय़ा वावरत असल्याचे निदर्शनास येताच. नागरिकांनी या बिबटय़ाचे छायाचित्रण केले. परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती समजताच भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत वनविभागाला स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे.
या परिसरात बिबटय़ाचा वावर नेहमीच असतो. यापूर्वी अनेकवेळा घरात घुसून बिबटय़ाने हल्ला केल्याच्या घटना आजूबाजूच्या गावांतही घडल्या असल्याने प्रचंड घबराट उडाली आहे. अनेक गावांमध्ये घरांना पक्के दरवाजे नसतात. अनेक लोक गोठय़ांच्या दरवाजांना केवळ फळ्या लावून रात्रीपुरता त्याला आतून काहीतरी आड लावतात. मात्र, थोडासा जोर लावला तर हे दरवाजे उघडतात. अशी परिस्थिती असल्यानं ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातारवण आहे.
बिबटय़ांचा वावर वाढला असून बिबटे जर घरात घुसू लागले तर काय करायचं, असे प्रश्न लोक एकमेकांना विचारत आहेत. त्यामुळे वनविभागाने तत्काळ कारवाई करावी अशी मागणी परिसरतील नागरिकांकडून केली जात आहे.