प्रवाशांसाठी 21 डब्यांच्या रेल्वे उपलब्ध होणार
प्रतिनिधी /बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने दोन साप्ताहिक एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यशवंतपूर (बेंगळूर)- पंढरपूर या मार्गावर एक्स्प्रेस तर म्हैसूर-हजरत निजामुद्दीन (दिल्ली) या दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे.
यशवंतपूर रेल्वे 11 रोजी तर म्हैसूर रेल्वे 12 रोजी सुरू होणार आहे. पंढरपूर रेल्वेमुळे विठ्ठल भक्तांना आता थेट रेल्वे उपलब्ध होणार असल्याने वारकऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे. दीड वर्षानंतर पंढरपूरला थेट रेल्वे उपलब्ध होणार आहे.
रेल्वे क्र. 06217 ही रेल्वे सायं. 6.15 वा. यशवंतपूर येथून निघणार आहे. पहाटे 5.15 वा. बेळगावला तर सकाळी 11.25 वा. पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात रेल्वे क्र. 06211 दुपारी 1.35 वा. पंढरपूर येथून निघालेली रेल्वे सायंकाळी 6.50 वा. बेळगाव तर सकाळी 6.10 वा. यशवंतपूर येथे पोहोचेल. ही रेल्वे प्रत्येक गुरुवारी यशवंतपूर येथून तर शुक्रवारी पंढरपूर येथून निघेल. या एक्स्प्रेसला एकूण 21 डबे जोडण्यात आले
आहेत.
06215 ही रेल्वे प्रत्येक शुक्रवारी रात्री 8.10 वा. म्हैसूर येथून निघणार आहे. सकाळी 7.15 वा. रेल्वे बेळगावला पोहोचेल. त्यानंतर दिल्लीकडे रवाना होईल. 06216 ही रेल्वे प्रत्येक सोमवारी सकाळी 5.10 वा. हजरत निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून निघणार असून मंगळवारी दुपारी 2.35 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर रात्री 3.30 वा. म्हैसूर येथे पोहोचेल. म्हैसूर येथून शुक्रवार दि. 12 तर हजरत निजामुद्दीन येथून सोमवार दि. 15 पासून या रेल्वे फेरीला सुरुवात होईल. या रेल्वेमध्ये एकूण 21 डबे असून प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता येणार
आहे.
विठ्ठल भक्तांची झाली सोय
पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी कर्नाटकातून मोठय़ा प्रमाणात भाविक पंढरपूरला जातात. परंतु कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून विठुरायाचा व विठ्ठल भक्तांचा संपर्क तुटला होता. रेल्वे व बससेवाही ठप्प होती. त्याचसोबत मंदिरदेखील बंद होते. काही दिवसांपूर्वी मंदिर सुरू करण्यात आले तरी थेट रेल्वे उपलब्ध नसल्याने भाविकांना मिरज येथून रेल्वे बदलून पंढरपूरला जावे लागत होते. यामुळे बऱयाचशा अडचणी येत होत्या. परंतु आता आठवडय़ातून एकदा का होईना पण थेट सेवा उपलब्ध झाल्याने विठ्ठल भक्तांची सोय झाली आहे.