प्रतिनिधी / कोल्हापूर
यशवंत पंचायतराज अभियान सन 2020-21 मध्ये पुणे विभागस्तरावर कोल्हापूर जिल्हा परिषदेने अव्वल स्थान पटकावल्यानंतर आता राज्यस्तरीय पुरस्कारासाठी मुल्यांकन होणार आहे. त्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीच्यावतीने औरंगाबाद विभागीय आयुक्तांमार्फत द्विसदस्यीय समिती 1 मार्च ते 3 मार्च या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिषदेसह विभागस्तरावर प्रथम आलेल्या कागल पंचायत समितीचीही पाहणी होणार आहे. यामध्ये विभागस्तरीय समितीने अंतिम केलेल्या गुणांकनाच्या प्रपत्राची व प्रस्तावाची पडताळणी केली जाणार आहे. या पडताळणी दरम्यान प्रपत्र अ व ब मधील मुद्यास अनुसरून आवश्यक ते दस्ताऐवज उपलब्ध करून द्यावे लागणार आहेत.
पाहणी करण्यासाठी येणाऱया द्विसदस्यीय समितीमध्ये औरंगाबादचे उपायुक्त (विकास) डॉ. अविनाश गोटे, औरंगाबाद जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ.सुनिल भोकरे यांचा समावेश आहे. या समितीकडून 1 ते 3 मार्चदरम्यान जिल्हा परिषदेसह कागल पंचायत समितीची पाहणी केली जाणार आहे.
साप्ताहिक सुट्टीदिवशीही जि.प.चे कामकाज राहणार सुरु
यशवंत पंचायतराज अभियानांतर्गत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी 1 मार्चला समितीकडून जिल्हा परिषदेची पाहणी केली जाणार आहे. त्यापार्श्वभूमीवर समितीला आवश्यक असणारे दस्ताऐवज अद्यावत करून ते उपलब्ध करून ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत धावपळ सुरु आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी या दोन साप्ताहिक सुट्टीदिवशीही जिल्हा परिषदेचे कामकाज सुरु राहणार आहे.