छप्परच उडून जाते, त्यावेळी घरातील कचरा स्वच्छ करण्यात काही अर्थ नसतो. ऑलिम्पिकसारख्या सर्वोच्च क्रीडा महोत्सवात यशस्वी ठरलेल्या, पण, नंतर खासगी आयुष्यातील काही घटनांमुळे अक्षरशः रसातळाला पोहोचलेल्या काही ऑलिम्पियननी याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. भारतीय ऑलिम्पियनच्या पदरी अशी निराशा आली नव्हती. पण, सुशील कुमार वादात सापडल्यानंतर त्याची प्रतिमा डागाळली आहे. या पार्श्वभूमीवर वादाच्या भोवऱयात सापडलेल्या 5 ऑलिम्पियन्सची एक झलक…
सुशील कुमारच्या प्रतिमेला कलंक
मागील 12-13 वर्षांपासून भारतीय कुस्तीचा चेहरामोहरा म्हणून पाहिल्या गेलेल्या सुशील कुमारला यंदा 26 मे रोजी आपला 38 वा वाढदिवस पोलीस कस्टडीत घालवावा लागला. माजी कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियन सागर राणाच्या हत्येत सहभाग असल्याच्या आरोपावरुन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि यामुळे भारतीय कुस्ती वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली.
4 मे रोजी छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंग आवारात झालेल्या झटपटीत 23 वर्षीय सागर राणाचा बळी गेला आणि त्यानंतर संशयाच्या भोवऱयात असलेला सुशील कुमार तब्बल 18 दिवस फरार होता. सुशील कुस्तीमधील भारताचा एकमेव डबल मेडलिस्ट असून त्याने 2008 बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्य तर 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदकाची कमाई केली आहे. सध्या त्याला रेल्वेच्या सेवेतून निलंबित केले गेले आहे.
ब्लेड रनर ऑस्कर पिस्टोरियसकडून प्रेयसीची हत्या
ब्लेड रनर या नावाने खास ओळख प्रस्थापित करणाऱया दक्षिण आफ्रिकन ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक ऍथलिट ऑस्कर पिस्टोरियसने 2011 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले तर 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये धडधाकट ऑलिम्पियन्सशी टक्कर देणारा तो पहिला डबल ऍम्प्युटी ऍथलिट ठरला. 2013 मध्ये मात्र त्याच्या कारकिर्दीला अचानक उतरती कळा लागली. आपलीच प्रेयसी रीव्हा स्टीनकॅम्पवर गोळय़ा झाडून तिची हत्या केल्याप्रकरणी पिस्टोरियसला 13 वर्षे 5 महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली. रीव्हावर आपण चोर समजून गोळय़ा झाडल्याचा दावा त्याने केला. शिवाय, आपल्या शिक्षेविरोधात अनेक स्तरावर दादही मागितली. ऑक्टोबर 2015 मध्ये त्याला तुरुंगातून पॅरोलवर मुक्त केले गेले होते.
फ्लाईंग फिश फेल्प्स वेगमर्यादा ओलांडल्याने वादात
23 सुवर्णपदकांसह 3 रौप्य, 2 कांस्य अशी चक्क 28 ऑलिम्पिक पदके जिंकणारा मायकेल फेल्प्स सर्वात महान ऑलिम्पियन म्हणून गणला जातो. पण, 2004 मध्ये फेल्प्सकडूनही एकदा आगळीक झाली व यामुळे त्याची प्रतिमा डागाळण्यास फारसा वेळ लागला नाही. मेरीलँड येथे फेल्प्सला मद्यधुंद अवस्थेत वेगाने कार चालवल्याबद्दल अटक केली गेली. कमाल वेगमर्यादा प्रतितास 45 मैल इतकी असताना त्याच्या कारचा वेग प्रतितास प्रतितास 84 मैल इतका असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अटक केल्यानंतर फेल्प्सने तत्काळ आपला गुन्हा कबूल केला होता.
उत्तेजक सेवनामुळे टीम मॉन्टगोमेरीच्या कारकिर्दीला कलंक
टीम मॉन्टगोमेरी उत्तेजक चाचणीत कधीही पॉझिटिव्ह आढळून आला नाही. मात्र, बॅल्कोची चौकशी करणाऱया अमेरिकन फेडरल ग्रँड ज्युरीसमोर त्याने स्टेरॉईडचे सेवन केल्याचे कबूल केले. टीम एकवेळ सर्वात वेगवान महामानव होता. अमेरिकेच्या या ट्रक अँड फिल्ड स्टारने 1996 ऍटलांटा ऑलिम्पिकमध्ये रौप्य तर 2000 सिडनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. पण, नंतर बॅल्को (बे एरिया लॅबोरेटरी कोऑपरेटिव्ह) डोपिंग स्कँडलमध्ये त्याचा सहभाग आढळून आला. एप्रिल 2016 मध्ये बँक फ्रॉड चार्जेसमध्येही तो दोषी आढळून आला. 2007 मध्ये त्याने गुन्हा कबूल केला आणि त्याला 4 वर्षांची शिक्षा ठोठावली गेली.
2008 मध्ये तर आणखी कहर झाला. तो व्हर्जिनियात हिरॉईनची तस्करी करताना सापडला आणि यासाठी 5 वर्षे कारावासाची शिक्षाही त्याला ठोठावली गेली.
सर्वोच्च शिखरावरुन रसातळाला फेकला गेला आर्मस्ट्राँग
सायकलिंग वर्तुळातील सर्वोच्च प्रतिष्ठेच्या टूर दि फ्रान्स स्पर्धेवर वरचष्मा राहिला तो लान्स आर्मस्ट्राँगचाच! 1999 ते 2005 हा आर्मस्ट्राँगचा सुवर्णकाळ. त्याने सिडनी 2000 ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई देखील केली. मात्र, नंतर डोपिंग स्कँडलमध्ये सापडल्यानंतर या अमेरिकन सायकलस्वाराची सर्व पदके काढून घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीने आर्मस्ट्राँगची तिसऱया क्रमांकाची नोंद रेकॉर्डबुकमधून काढून टाकली. एकवेळ आर्मस्ट्राँग लाखो चाहत्यांसाठी हिरो होता. पण, वैभवाच्या सर्वोच्च शिखरावरुन तो पार खाली फेकला गेला आणि त्याच्या कारकिर्दीची खऱया अर्थाने अधोगती झाली.