प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील उटम्बर येथे असणारा दर्गा हा पर्यटन वर्ग ‘क’ मधून ‘ब’ मध्ये यावा यासाठी दर्ग्याच्यावतीने राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले. यावेळी आपण लवकरात लवकर याबाबत प्रयत्न करून दर्गा ‘ब’ वर्गात आणण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दर्गा कमिटी सदस्यांना दिले. यामुळे दापोली 653 एकर जमिनीचा मालक असणारा दर्ग्याचे रुपडे पालटण्यासाठी मदत होणार आहे.
पदरी 653 एकर जमीन असून देखील यातून दर्ग्याला एक रुपयाचे उत्पन्न मिळत नाही. मात्र सदर दर्गा ‘क’ पर्यटन वर्गातून ‘ब’ पर्यटन वर्गात आल्यास शासनाकडून पर्यटनाचा जादा निधी उपलब्ध होईल व दर्ग्यामध्ये अधिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येतील. यातून दर्ग्याकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.