प्रेमानंद दिवकर यांची मागणी : कळंगूट मतदारसंघ फोरमतर्फे पंचायतीला निवेदन
प्रतिनिधी /म्हापसा
सागरी किनारे तसेच आसपास परिसराचे परप्रांतीय बिल्डर लॉबीपासून संरक्षण करण्याची मागणी करीत कळंगूट मतदारसंघ फोरमने स्थानिक पंचायतीला निवेदन सादर केले आहे. यावेळी पंचायत आवारात फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गेल्या वर्षभरात कांदोळी येथील समुद्र किनारी दिल्लीस्थित बिल्डरांकडून नवनवीन प्रकल्पांसाठी किनाऱयालगतची झाडे झुडपे तसेच बेकायदा कापण्यात येत असल्याचे दिवकर यांनी पंचायत मंडळाच्या निदर्शनास आणून दिले. सीआरझेड तसेच पर्यावरण नियंत्रण बोर्डाचा कायदा धाब्यावर बसवून दिल्लीस्थित बिल्डर लॉबीकडून प्रकार कांदोळीतील किनारी भागात, असे प्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार करण्यात आली. आतापर्यंत याभागात बेकायदा उभारलेल्या बांधकामांवर सरकारी यंत्रणांकडून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कळंगूट फोरमकडून करण्यात आली आहे.
गोवा आणि येथील किनारे आपल्या पूर्वजांकडून आपल्यासाठी राखून ठेवण्यात आलेली नैसर्गिक संपदा आहे. त्यामुळे निदान आपल्या कार्यकाळात तरी पंचायत क्षेत्रातील निर्बंध घातलेल्या परिसरात कुठल्याही प्रकारचे बेकायदा बांधकाम उभारण्यास पंचायतीकडून परवाना दिला जाणार नाही. नियम धाब्यावर बसवून बांधकाम केल्यास ते तोडण्याची कारवाई करण्यात येईल, असे कळंगूटचे सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.