महसूल मंत्री आर. अशोक यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने कंटेन्मेंट झोनची संख्याही वाढली आहे. कंटेन्मेंट झोन म्हणून घोषणा झालेले भाग 100 मीटरपर्यंत सीलडाऊन करण्यात येत असल्याने अनेक भागात रहदारीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने सीलडाऊनच्या पद्धतीत बदल केला आहे. केवळ रुग्णाचे घर सीलडाऊन करण्यात येत आहे, अशी माहिती महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिली.
बेंगळूरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्ण असणारे भाग, रस्ते सीलडाऊन करण्यात येत होते. मात्र, यापुढे रुग्ण आढळून आलेले घर सीलडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची कार्यवाही देखील करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
यापूर्वी रुग्ण आढळून आलेला 100 मीटर परिसर बॅरिकेड्स लावून सीलडाऊन करण्यात येत होता. या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून या भागातील सर्व दुकाने, व्यवसाय बंद ठेवण्यात येत होते. आता त्यामध्ये बदल करण्यात आल्याचे आर. अशोक यांनी सांगितले आहे.
बेंगळूरमध्ये बाधिताचे घरे सीलडाऊनची पद्धत रद्द
कोरोना रुग्ण असणारे भाग सीलडाऊन करण्याची पद्धत मंगळवारपासून बदलण्याचा निर्णय बेंगळूर महानगरपालिकेने घेतला आहे. बेंगळूर महापालिका आयुक्त मंजुनाथ प्रसाद यांनी याबाबत माहिती दिली असून कोरोनाबाधित व्यक्तीच्या घरासमोर बॅरिकेड्स लावण्यात येत होते. आता ही पद्धत रद्द करण्यात येत आहे. जर घरामध्ये एकच व्यक्ती बाधित असेल तर बॅरिकेड्स लावून घर सीलडाऊन न करता प्रवेशद्वारावर सतर्कतेचा संदेश असणारा फलक वालण्यात येईल. 100 मीटर परिसरात तीन किंवा त्यापेक्षा जास्त रुग्ण आढळले तरच त्या भागाला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येईल.