भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील : राणे शिवसेनेच्याच धाटणीतले : अनिल परब घाबरलेत
प्रतिनिधी / सांगली
`एका गालावर थप्पड मारल्यास, दुसरा गाल पुढे करेल’ अशी भाजपची भूमिका नसेल. यापुढे ठोशास ठोशानेच उत्तर देऊ, असा गर्भित इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अप्रत्यक्षरित्या विरोधकांना दिला. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारला कायदा कळत नाही, त्यांना फक्त पैसा कळतो, अशी खरमरीत टीकाही पत्रकार बैठकीत बोलताना केली.
सरकार निवडणुकीसाठी प्रभाग रचना करायला निघाले आहे. लोकही निवडणुकीचीच आणि तुमची वाट लावायला वाट पहात आहेत, असे सांगून पाटील म्हणाले, सरकारमधील तीन पक्ष दिवसभर भांडतात आणि सरकार पडायचा मुद्दा आला की एकमेकांना घट्ट मिठी मारून बसतात. नेते, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे काम सुरु आहे. पण, भाजप गप्प बसणार नाही. ठोशास ठोशानेच उत्तर देऊ.
अनिल परब काय बोलले हे घराघरांत पोहोचले आहे. केंद्र सरकारनेहे त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणात लवकरच याचिका दाखल होईल. नारायण राणे यांच्याविषयीचे त्यांचे विधान धक्कादायक होते. ते मंत्री असल्याने स्यूमोटो कारवाई करता येईल का, हेही तपासून पाहतो आहोत. वकिलांची फौज त्यावर काम करते आहे. आता ते घाबरले आहेत. मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव की अमृतमहोत्सव माहिती नसावे, हे गंभीर नाही का? त्यामुळे राज्यभरातून 75 हजार पत्रे पाठवून मुख्यमंत्र्यांना त्याची जाणीव आम्ही करून देणार आहोत.
भाजप-शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर एकच आहेत. पण, भाजपमध्ये बाहेरून आलेले लोक वातावरण खराब करत आहेत. शिवसेनेवर नाहक बोलतात. दगड फेकण्याची भाषा केली जाते. भाजपमधील जुने नेते असे कधीच बोलत नाहीत, असे विधान करणाऱया खासदार संजय राऊत यांचीही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, राऊत भाजपमध्ये भांडणे लावण्याचा केविलवाणा प्रयत्न करू नये, एकविचाराचे सोडा. गेल्या पाच वर्षातील सामना पेपर काढा. रोज भाजपला, मोदी-शहांना शिव्या, योगींना शिव्या देत होता. त्याचे रिसर्च तुम्ही करा, मी केले तर तुम्हाला परवडणार नाही, अशा शब्दात ठणकावले.
राणे शिवसेनेच्या धाटणीतले
चंद्रकांत पाटील म्हणाले, `नारायण राणे हे शिवसेनेच्याच धाटणीतले नेते आहेत. तिकडेच तयार झालेत. मारेन, तोडेन, फोडणे ही तिकडचीच भाषा आहे. राजू शेट्टीही वारं आहेत. ते कोणाच्या हातात सापडत नाहीत. महाविकास आघाडीला मात्र ते हातात सापडलेत, असे वाटतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.