ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने महाराष्ट्रातील दोन गावांना दत्तक घेतले आहे. पाथर्डी आणि सकुर अशी या दोन गावांची नावे आहेत. या गावातील 1500 लोकांना जॅकलीन ने ही गावे तीन वर्षांसाठी दत्तक घेतली असून गावातील 1500 लोकांची तीन वर्षांसाठी ती मदत करणार आहे. 11 ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस झाला. वाढदिवसानिमित्त तिने स्तुत्य काम केले आहे. यासाठी तिने ‘ॲक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन’सोबत करार केला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना जॅकलीन म्हणाली, हे विचार माझ्या मनात खूप आधीपासूनच होते. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांसाठी हे वर्ष फार त्रासदायक जात आहे. मी दत्तक घेतलेल्या या दोन गावांतील जवळपास 1550 लोकांपर्यंत आम्ही मदत पोहोचवणार आहोत. इतकेच नाही तर गावातील महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत वैद्यकीय सहाय्य दिले जाणार आहे.
तसेच कुपोषित मुलांची देखभाल देखील केली जाणार आहे. यासोबतच गावात किचन गार्डन बांधण्यात येईल. सर्व सूचनांचे पालन करून आणि सुरक्षेची काळजी घेऊन लोकांची मदत केली जाईल, असेही तिने यावेळी सांगितले.