ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला उद्याचा दौरा रद्द केला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्वीट संदेशात म्हणाले की, उद्या, कोविड-19 परिस्थितीबाबत उच्च स्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. माझ्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यामुळे, मी पश्चिम बंगालला जाणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत. सातव्या आणि आठव्या टप्प्यातल्या निवडणुकांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते.
पश्चिम बंगालमध्ये पाच टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्या आहेत. आज निवडणुकीचा सहावा टप्पा पार पडला. 26 एप्रिलला, सातव्या टप्प्यात 5 जिल्ह्यातल्या 36 जागांसाठी मतदान होईल. तर आठव्या टप्प्यातलं मतदान 29 एप्रिलला होणार आहे.