मुंबई \ ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात बृहन्मुंबई महानगरपालिका व मे. आय.डी. ई वॉटर टेक्नॉलॉजीज लि. यांच्यादरम्यान 200 दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाबाबत सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. हा प्रकल्प एक क्रांतिकारी पाऊल असून आज अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. यामुळे इस्रायली तंत्रज्ञानाद्वारे समुद्राच्या पाण्याला गोड करण्याच्या प्रकल्पाला गती मिळणार आहे.
इस्रायलच्या मुंबईतील दूतावासानंही याची दखल घेत खास मराठीत ट्विट केले आहे. त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून महाराष्ट्रकाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. इस्रायलच्या मुंबईतील दूतावासांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्यासोबत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात हा सामंजस्य करार करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, जगात काही देशांनी यापूर्वी समुद्राचे पाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नि:क्षारीत करून मोठ्याप्रमाणात वापरण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक तंत्रज्ञानाची एक किंमत असते परंतू त्यापेक्षा माणसाचे आयुष्य अधिक मौल्यवान असून त्यांना पिण्याचे पाणी 24 तास उपलब्ध करून देण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. हे करत असतांना किती धरणे बांधायची आणि त्यासाठी किती झाडं तोडून जमिनीचे वाळवंट करायचे याचा विचार करणे आणि पर्यायी मार्गाचा अवलंब करणे अगत्याचे आहे. हीच बाब विचारात घेता समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण करण्याचा प्रकल्प आता मुर्त रुपाला येत आहे.2025 पासून या प्रकल्पातून शुद्ध पाणी पुरवठा सुरु होईल. शेवटी विकास करतांना या सगळ्या बाबी विचारात घेणे महत्वाचे आहे. हा प्रकल्प मुंबईकरांना नक्की दिलासा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करतांना मुख्यमंत्र्यांनी आज मालाड येथे उभ्या करण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालय तसेच कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पणातून मुंबईकरांच्या सेवा सुविधांमध्ये वाढ करण्यात आली, अशीही माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, इस्त्रायलचे महावाणिज्यदुत याकोव फिनकेलस्टाईन, आय.डी.ई वॉटर टेक्नॉलीजीचे पदाधिकारी, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, एमएमआरडीए आयुक्त एस. श्रीनिवास उपस्थित होते.