ऑनलाईन टीम/तरुण भारत
युक्रेन आणि रशिया यांच्यात गेल्या 12 दिवसांपासून युद्ध सुरुच आहे. अनेक देशांनी रशियाला युद्ध थांबविण्याचे आवाहन केले होते. अमेरिकेने रशियाला धमकीही दिली होती. अनेक निर्बंध देखील लादले आहेत. तरीही रशियाने कुणालाही न जुमानता युद्ध सुरूच ठेवलं आहे. दरम्यान, रशिया-युक्रेन यांच्यामध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या होत्या. यावेळी रशियाने युक्रेनला काही अटी घातल्या होत्या. पण युक्रेनने त्या अटी मान्य केलेल्या नाहीत. सोमवारी पुन्हा चर्चेची तिसरी फेरी पार पडली यावेळी रशियाने युक्रेन समोर चार अटी ठेवल्या आहेत. त्या अटी मान्य केल्या तरच हे युद्ध थांबवू असं रशियानं म्हंटल आहे.
दरम्यान, युक्रेन आणि रशिया यांच्या दरम्यान सोमवारी तिसऱ्या फेरीची बैठक झाली. युक्रेननं ही बैठक सकारात्मक झाल्याचं म्हटलंय, तर रशिया मात्र समाधानी नसल्याचं दिसून येतंय. दरम्यान, किव्हने जर आमच्या अटी मान्य केल्या तर आम्ही लष्करी कारवाया थांबवण्यास आहोत, असं क्रेमलिनच्या प्रवक्त्याने सोमवारी सांगितलं. युक्रेनने लष्करी कारवाई थांबवावी, युक्रेनने संविधान बदलावं, क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्या, डोनेस्तक आणि लुगान्स्क प्रदेशांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्या अशा चार अटी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्यात.