ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
भारताविषयी नेहमी गोडवे गाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदलावरून भारतासह तीन देशांवर टीकास्त्र सोडले आहे. अमेरिकेत सर्वात कमी कार्बन उत्सर्जन होत आहे. याउलट चीन, भारत आणि रशिया आपल्या देशातील हवेच्या स्तराचा विचार करत नाही. या तीन देशांतील हवेचा स्तर अतिशय वाईट आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीतील राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यातील चर्चेची शेवटची फेरी आज संपली. डोनाल्ड ट्रम्प यांनी या फेरीत हवामान बदलाच्या मुद्यावर भूमिका मांडताना भारतासह चीन आणि रशियावर टीका केली. हवामान बदलाच्या दिशेने भारताकडून केल्या जाणाऱ्या कामावर ट्रम्प यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीदेखील हवा प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जनाच्या मुद्द्यांवर विरोधकांसोबतच भारत, रशिया आणि चीनवर टीका केली होती.
ट्रम्प आणि बायडेन यांच्यातील आजचे चर्चासत्र जवळपास 90 मिनिटे चालले. मागील 35 वर्षाच्या तुलनेत आपल्या नेतृत्वात कार्बन उत्सर्जनाची स्थिती सर्वात चांगली आहे. तसेच आम्हाला अब्ज रुपये खर्च करायचे होते आणि आमच्याशी भेदभाव केला जात होता, म्हणून आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो, असेही ट्रम्प म्हणाले.