पाकिस्तानी महिला उत्तरप्रदेशात सरपंचपदी
उत्तरप्रदेशच्या एटा जिल्हय़ात धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. तेथे एक पाकिस्तानी महिला फसवणुकीच्या माध्यमातून गावाची सरपंचच झाली आहे. याचा खुलासा झाल्यावर तिच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आल्याने ती फरार झाली. पोलिसांनी तिला शोधून काढत अटक केली आहे.
गुदाऊ गावाची सरपंच होणारी पाकिस्तानी महिला बानो बेगम सुमारे 35 वर्षांपूर्वी आईवडिलांसह पर्यटन व्हिसावर देशात दाखल झाली होती. तिने अजमत अली याच्यासोबत विवाह केला होता. तेव्हापासून बेगमला दर तीन वर्षांमध्ये व्हिसाला मुदतवाढ मिळत आहे.
नियमानुसार व्हिसाधारक विदेशी नागरिक भारतात कुठलीच निवडणूक लढवू शकत नाही. पण नियमांकडे डोळेझाक करत महिलेला आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड देखील प्रदान करण्यात आले. बानो बेगमला सरपंचपदी नियुक्त करण्यात आल्यावर गावातील अन्य लोकांनी आक्षेप घेत तक्रार केली होती.