सुधाकर काशीद/वरिष्ठ पत्रकार तरुण भारत
हा VIDEO आहे आज गुरुवार पहाटे चारचा. हा गवा नव्हे गव्याचा एक बछडा चक्क सीपीआर जवळच्या चिमासाहेब चौकातून सिद्धार्थनगर सोन्या मारुती चौकाकडे निघाला होता. त्याचा अधिवास असलेले जंगल सोडून तो चुकून माणसांच्या जंगलात गेल्या तीन चार दिवसापासून आहे. हा बछडा एकटाच. म्हणजे नक्कीच त्या गव्याचा परिवार विखुरलेला. हा बछडा चिमासाहेब चौकातून सोन्यामारुती मंदिराच्या पिछाडीस असलेल्या डीवायएसपी ऑफिस पासून परत वळला. आणि तो पोलीस लाईनीत गेला . पुन्हा तेथून धावतच बाहेर पडला. परत सिद्धार्थनगर कमानीपासून नाल्यात उसाच्या दिशेने गेला. या वेळचे वैशिष्ट्य असे की, वेळ पहाटे चारची. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. फक्त वनविभाग व महापालिका अग्निशामकचे जवान शांतपणे गव्या पाठोपाठ जात होते. हा गवा खूप लहान. नक्कीच बावरलाय.
नेमके कोठे व कसे जायचे त्याला या क्षणी काही सुचत नाही. एखादे लहान बालक त्याचे आईबाबा थोडा वेळ त्याच्यापासुन दूर गेले तर कसे बावरते तसाच हा गव्याचा बछडा बावरला आहे.
आता येथेच आपली खरी जबाबदारी आहे. विखुरलेला हा गव्याचा कळप पुन्हा एकत्र आला की शांतपणे परत निघून जाणार आहे. गोंधळ केला की मात्र हा बछडा आणखी बावरणार हे नक्की आहे. त्याला नागरी वस्तीत येण्यापासुन रोखले पाहिजे हे खरे आहे. पण गवा फक्त वन खात्याचा नाही. तो आपल्या कोल्हापुरच्या वनवैभवाचं एक प्रतिक आहे. त्यामुळे सर्वानीच या गव्याच्या बछड्याला वाट शोधून देण्यासाठी आपल्या परीने सहकार्य करण्याची गरज आहे. आणि गोंधळ, गव्याचा पाठलाग, त्याला मातीची ढेकळे फेकून मारणे एवढे थांबवले तरी तेच खूप मोठे सहकार्य असणार आहे.