जगातील बहुतांश हिस्स्यांमध्ये पितृसत्ताक परंपरा दिसून येते. पितृसत्ताक परंपरेत राजकीय, आर्थिक, सामाजिक साधनसंपत्तीवर केवळ पुरुषांचाच पहिला हक्क असतो, महिलांना वैयक्तिक जीवनापासून व्यावसायिक जीवनात वर्चस्वाच्या साधनांपासून वंचित रहावे लागते. पण युरोपच्या एका बेटावर ही स्थिती पूर्णपणे बदलते. एस्टोनियाच्या बाल्टिक समुद्रातील किह्नू बेटावर 4 गावे असून सुमारे 700 ते 1 हजार लोकांचे वास्तवय आहे. येथे हॉटेलची कुठलीच सुविधा नाही तरीही जगभरातील पर्यटक तेथे येत असतात आणि या जागेचे संचालन महिलाच करत आहेत.
किह्नू युरोपमधील अखेरचा मातृसत्ताक समुदाय मानला जातो. याला महिलांचे बेट देखील म्हटले जाते. 19 व्या शतकाच्या आसपास या बेटावरील पुरुषांची संख्या खूपच कमी होऊ लागली होती. मासेमारी आणि शिकारीवर जात असल्याने पुरुष कित्येक महिने स्वतःच्या घरांपासून दूर राहतात. अत्यंत कमी वेळ बेटावर घालवित असल्याने पुरुषांची प्रासंगिकता येथील संपली आहे. या बेटावर पुरुषांची उणीव महिलांनी भरून काढत एक मातृसत्ताक समुदायाची निर्मिती केली आहे.
महिला येथे मुलांच्या पालन-पोषणासह कृषी, पारंपरिक विणकाम आणि हस्तशिल्प यासारखी कामे करतात. याचबरोबर बेटाशी संबधित अनेक संस्थांचे कामकाज देखील महिलाच चालवतात. विवाहांपासून अंत्यसंस्काराच्या जबाबदारीसह सर्वप्रकारची कामे महिला परस्परांमध्ये विभागून पार पाडतात.
या बेटाची सर्वात पहिली प्राथमिकता मुले, त्यानंतर समुदाय आणि त्यानंतर पुरुष आहेत. मातृसत्ताक समाजाच्या मदतीने आम्ही संदेश देऊ इच्छितो असे अनेकांना वाटते, पण मागील कित्येक दशकांपासून हा समुदाय अशाप्रकारे चालत आला आहे आणि आम्ही याच्या व्यतिरिक्त दुसरी कल्पनाही करू शकत नसल्याचे एका महिलेने म्हटले आहे.
किह्नू बेटावरील परंपरा कायम ठेवण्यासह येथील महिला शेती, मुलांचे पालन-पोषण आणि दैनंदिन जीवनाच्या जबाबदाऱयांचे संतुलन राखत असतात. येथील जुनी पिढी परंपरा आणि संस्कृती जिवंत ठेवू इच्छिते. नव्या पिढीला पर्यटनाद्वारे उत्पन्न मिळविण्याची इच्छा आहे, तर जुन्या पिढीचे लोक पर्यटनाला फारसे महत्त्व देत नाहीत. या बेटाचे नाव युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत सामील आहे.