ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीतील गरिबांना आणि शिधापत्रिकाधारकांना दिल्ली सरकार या महिन्यात दुप्पट म्हणजे प्रतिव्यक्ती दहा किलो धान्य मोफत देणार आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
ते म्हणाले, सध्या दिल्लीमध्ये एक कोटपेक्षा अधिक नागरिकांना मोफत धान्य दिले जात आहे. यामध्ये 72 लाख शिधा धारक आणि तीस लाखाहून अधिक अन्य नागरिकांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात शिधापत्रिका धारकांना दीडपट म्हणजेच प्रतीव्यक्ती साडेसात किलो आणि ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही त्यांना पाच किलो धान्य मोफत देण्यात आले.
मात्र, या महिन्यात आता सर्वांना दुप्पट म्हणजे दहा किलो धान्य देण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. त्याच बरोबर जीवनावश्यक वस्तूंचा किट ही प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार आहे, असं ही केजरीवाल यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्या दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या तीन हजार पेक्षा अधिक असून आत्तापर्यंत 1167 रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.