- अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना सुविधा
ऑनलाईन टीम / पुणे :
मागील सहा महिन्यांपासून बंद असलेली पुणे ते लोणावळा या मार्गावरील प्रवासासाठी उपनगरीय रेल्वे सेवा 12 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. पोलीस आयुक्तालय आणि रेल्वे प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र, ही सेवा केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे, हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.
लोकल सुरु करण्याच्या या प्रक्रियेकरता राज्य शासनातर्फे पुण्यातील पोलीस आयुक्तांना अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारीवर्गासाठी ओळखपत्रांची व्यवस्था करण्याचे काम सोपवण्यात आले आहे. शिवाय या प्रक्रियेसाठी नोडल ऑफिसरही ठरवण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त किंवा त्यांच्याकडून निवड करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांकडून ही ओळखपत्र पुरवण्यात येणार आहेत. क्यूआर कोडवर ही ओळखपत्र आधारलेली असतील. रेल्वे स्थानकात प्रवेश करतेवेळी हे क्यूआर ओळखपत्र दाखवल्यानंतर सदर व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, पुणे स्थानकातून लोणावळ्याला जाण्यासाठी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी आणि सायंकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटेल. तर लोणावळ्यावरून पुण्याला येण्यासाठी सकाळी आठ वाजून 20 मिनिटांनी आणि सायंकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी गाडी सुटणार आहे.