ऑनलाईन टीम / देहरादून :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. असे असले तरी पूर्णपणे साखळी तुटलेली नाही. देशात आता अनलॉक 0.6 प्रक्रिया सुरू झाली आहे. सरकारकडून यासंबंधी अद्याप कोणत्याही प्रकारच्या सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत. मात्र 30 नोव्हेंबरपर्यंत अनलॉक 5.0 च्या नियमांचे पालन करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, लॉकडाऊननंतर देशात अनलॉकच्या माध्यमातून अनेक सेवा आणि उद्योग सुरू करण्यात आले असून देशाची विस्कटलेली आर्थिक घडी देखील आता सावरत आहे. राज्यातील शाळा पुन्हा कधी सुरू होणार यावर चर्चा सुरू आहे.
मात्र, काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या आहे, तर केंद्र सरकारने शाळा पुन्हा सुरू करण्याचे निर्णय राज्य सरकारवर सोपवले आहेत. त्यामुळे उत्तराखंड सरकारने आज पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये आज पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. परंतु सध्या फक्त 10 वी आणि 12 वी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जर का परिस्थिती नियंत्रणात असेल तर छोटे वर्ग देखील सुरू करण्यात येणार आहेत.
उत्तराखंड सरकार लवकरच कॉलेज देखील सुरू करण्याच्या तयारीत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर सरकार पहिल्या टप्प्यात प्रयोगिक विषयांचे शिक्षण सुरू करणार आहे.
उत्तराखंडसह आसाम, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आजपासून शाळा सुरू होणार आहेत. तर दुसरीकडे दिल्ली, गुजरात, महाराष्ट्रसोबतच अनेक राज्यांना पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवण्यास सांगितले आहे.