ऑनलाईन टीम / मल्लपुरम :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनेक राज्यातील सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. अनेक राज्यातील शाळा आणि कॉलेज देखील सुरू करण्यात आल्या आहेत. त्यातच केरळ राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
केरळमध्ये देखील 10 वी, 12 वी परीक्षांच्या तयारीसाठी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अशातच मल्लापुरम भागात असलेल्या दोन शाळांमधील तब्बल 192 विद्यार्थी आणि 72 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारनचेरी उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये लक्षणे आढळल्यानंतर या शाळेतील एकूण 638 विद्यार्थ्यांची चाचणी केली असता 149 विद्यार्थी आणि 39 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मल्लापुरम भागातील दुसऱ्या एका शाळेतील 43 विद्यार्थी आणि 33 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्व जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.