ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे. असे असले तरी पूर्णपणे साखळी तुटलेली नाही. दरम्यान, लॉकडाऊननंतर देशात अनलॉकच्या माध्यमातून अनेक सेवा आणि उद्योग सुरू करण्यात आले असून देशाची विस्कटलेली आर्थिक घडी देखील आता सावरत आहे. यासोबतच कर्नाटक, बिहार आणि ओडिशासह काही राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.
तर गुजरात आणि राजस्थानसह काही राज्यात आजपासून शाळा आणि कॉलेज सुरू होणार आहेत. तर काही राज्ये 14 आणि 18 तारखेपासून शाळा आणि कॉलेज सुरू करण्याच्या तयारीत आहेत.
- गुजरात :
गुजरात सरकारने नुकतीच 10 वी आणि 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या शाळा 11 जानेवारीपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. यासह महाविद्यालय पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधारकांसाठी पुन्हा उघडण्यात येणार आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा यांनी सांगितले की, शाळेमध्ये येताना विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांची समंत्ती घ्यावी लागेल. तथापि शाळा शासनाच्या प्रमाणीत कार्यप्रणालीचे अनुसरण करतील. यावेळी उपस्थिती अनिवार्य नाही.
- राजस्थान : पुन्हा शाळा सुरू करण्याचे आदेश
राजस्थानमध्ये मेडिकल कॉलेज, पैरामेडिकल कॉलेज आणि नर्सिंग कॉलेज 11 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव थोडा कमी झाला असल्याने आता 18 जानेवारी पासून शाळा, कॉलेज आणि कोचिंग सेंटर सुरू होणार आहेत. असे असले तरी या सोबतच सरकारने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र :
महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगितले की, सरकार 50% क्षमतेनुसार कॉलेज सुरू करण्याबाबत 20 जानेवारीपर्यंत निर्णय घेणार आहेत. तर राज्यातील ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्या ठिकाणी 9 वी ते 12 वी पर्यंतच्या शाळा यापूर्वीच सुरू केल्या आहेत.