ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील एक ते दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता विविध राज्यांमध्ये काही प्रमाणात सुरू केल्या जात आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशातील शाळा ( 9 वी ते 12 वी चे वर्ग) चार महिन्यांनंतर आजपासून 50 टक्के क्षमतेने सुरु झाल्या आहेत. यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. तर काही राज्यांमध्ये 2 ऑगस्टपासूनच शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.
वर्गात जास्तीत जास्त 50 टक्के विद्यार्थी उपस्थिती राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थी आणि स्टाफला कोरोना प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत येताना तोंडावर मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- गोरखपूरमध्ये थर्मल स्क्रिंनिंगनंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिह्यात थर्मल स्क्रिनिंगनंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे. सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी मास्क लावून शाळेत आले आहेत. या सोबतच काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी दोन शिफ्टमध्ये शाळा सुरू केल्या जाणार आहेत.
- लखनऊमध्ये विद्यार्थ्यांचे फूल देवून स्वागत
राजधानी लखनऊमधील कानपुर रोडवरील एका कॉलेजात विद्यार्थ्यांचे स्वागत फूल देवून करण्यात आले. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट देत स्वागत केले. तर सितापूर रोडवरील सेंट जोसेफ स्कूलमध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करत शाळेमध्यश विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.