ऑनलाईन टीम / मुंबई :
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी मुंबई लोकल मधून प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांबरोबरच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी आज देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने केलेल्या मागणीला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असून मध्य आणि पश्चिम रेल्वेला यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच जेईई आणि नीट या दोन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई लोकल मधून प्रवास करण्याची विशेष परवानगी देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी मुंबई लोकलचा प्रचंड फायदा झाला. त्या दरम्यान, राज्यातील अंतिम वर्षाची परीक्षा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येतील असेही जाहीर करण्यात आले. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन परीक्षा देण्याची सोय उपलब्ध नसेल त्यांना जवळच्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देता येईल असेही जाहीर करण्यात आले.
त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विद्यार्थ्यांच्या रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि हॉल तिकीट दाखवून लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तसेच महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त बुकिंग काऊंटर देखील सुरू करण्यात येणार आहेत. मात्र हा प्रवास करताना विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच स्थानकांवर गर्दी करू नये असे आवाहन रेल्वे कडून करण्यात आले आहे.