पाकिस्तान-तुर्कस्तानच्या चिंतेत पडली भर
दुबई
तुर्कस्तान आणि पाकिस्तान यांच्या आघाडीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही आता कंबर कसली आहे. भारतीय वायुदलाने संयुक्त अरब अमिरातमधील युद्धाभ्यासात गुरुवारपासून भाग घेतला आहे. डेजर्ट फ्लॅग नावाच्या या युद्धाभ्यासात भारताच्या 6 सुखाई-30 एमकेआय लढाऊ विमानांनी भाग घेतला आहे. अरब देशांसोबत युद्धाभ्यासामुळे भारताचे संरक्षण संबंध नवी उंची गाठणार आहेत, तर तुर्कस्तान आणि पाकिस्तानची चिंता वाढणे निश्चित आहे. युद्धाभ्यासत तुर्कस्तानचा विरोधक ग्रीस सामील झाला आहे.
3 ते 27 मार्चपर्यंत चालणाऱया ‘डेजर्ट फ्लॅग’ युद्धाभ्यासात भारत आणि युएईसह अमेरिका, फ्रान्स, सौदी अरेबिया यांच्यासह एकूण 10 देश सामील झाले आहेत. या युद्धाभ्यासात ग्रीस, जॉर्डन, कुवैत आणि इजिप्तला निरीक्षक देशाचा दर्जा देण्यात आला आहे. सुखोईसह भारताची दोन सी-17 मालवाहू विमानेही यात सहभागी झाली आहेत. या युद्धाभ्यासामुळे पाकिस्तान तसेच मुस्लीम जगताचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगणाऱया तुर्कस्तानची डोकेदुखी वाढली आहे.
सौदी अन् युएईसोबत जवळीक
अरब देशांमध्ये आतापर्यंत पाकिस्तानी सैन्याचा प्रभाव राहिला होता. पण सौदी अरेबिया आणि त्याचा घनिष्ठ मित्र संयुक्त अरब अमिरात हे दोघेही आता भारतासोबत संरक्षण संबंध वृद्धिंगत करत आहेत. 20-25 फेब्रुवारीदरम्यान अबू धाबी येथे आयोजित नौदल विषयक प्रदर्शनात भारताच्या आयएनएस प्रलयने भाग घेतला होता. डिसेंबर महिन्यात भारतीय सैन्यमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी सौदी अरेबिया तसेच युएईचा दौरा केला होता. याचबरोबर राफेल लढाऊ विमाने फ्रान्समधून भारतात येत असताना युएईच्या वायुदलाच्या टँकर्सनी आकाशात रीफ्ल्यूलिंग सहाय्य पुरविले होते.
तुर्कस्तानला फ्रान्सचा विरोध
पूर्व भूमध्य समुद्रातील सीमेवरून तुर्कस्तानसोबत झालेल्या वादात फ्रान्सने ग्रीसला पाठिंबा दिला आहे. स्वतःच्या सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी अब्जावधी युरोंचा कार्यक्रम सुरूच ठेवणार असल्याचे ग्रीसने जाहीर केले आहे. ग्रीस स्वतःच्या संरक्षण क्षमतेला मोठय़ा प्रमाणावर वाढवू पाहत असून यात फ्रान्सची त्याला मदत मिळत आहे.
भारत-फ्रान्स सहकार्य
भारतीय वायुदलाने अलिकडेच स्वतःच्या राफेल विमानांसह जोधपूरमध्ये फ्रान्ससोबत युद्धाभ्यास केला आहे. या युद्धाभ्यासाचे कोडनेम ‘डेजर्ट नाइट 2021’ ठेवण्यात आले होते. या युद्धाभ्यासामुळे ग्रीसला बळाच्या जोरावर दडपू पाहणाऱया तुर्कस्तानला मोठा धक्का बसणार आहे. ग्रीसने तुर्कस्तानच्या सैन्याला रोखण्याठी अलिकडेच फ्रान्ससोबत 18 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी करार केला आहे.