वृत्तसंस्था/ दुबई
महिलांच्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वी संयुक्त अरब अमिरातमध्ये आशिया खंडातील संघांकरिता पात्र फेरीची स्पर्धा उद्यापासून (सोमवार दि. 22) सुरू होणार आहे. सोमवारी संयुक्त अरब अमिरात आणि मलेशिया यांच्यात सलामीचा सामना होणार आहे.
आशियाई पात्र फेरीच्या स्पर्धेत भुतान, संयुक्त अरब अमिरात, हाँगकाँग, कुवेत, मलेशिया, नेपाळ या संघांचा समावेश आहे. आयसीसी पुरुषांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिरातने यशस्वी करवून दाखवली. त्यामुळे, भविष्यकाळात आयसीसीच्या काही स्पर्धा तेथे भरवल्या जातील, अशी चर्चा आहे. महिलांची आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा 2023 साली दक्षिण आफ्रिकेत होणार आहे.
आशियाई पात्र फेरीच्या स्पर्धेत सहा संघांचा समावेश असून विजेता संघ आगामी स्पर्धेसाठी आशिया खंडातून थेट पात्र ठरेल. संयुक्त अरब अमिरात महिला संघाचे नेतृत्व छाया मुगलकडे सोपविण्यात आले आहे. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर या स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. भुतान महिला संघाचे नेतृत्व येशी चोडन करीत आहे. कुवेत संघाचे नेतृत्व ऍना शेरीफ तारीककडे आहे.