विक्रम नोंदविणारा पहिला देश
संयुक्त अरब अमिरातने (युएई) कोरोना विषाणूच्या चाचण्यांप्रकरणी विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. स्वतःच्या लोकसंख्येपेक्षा अधिक कोविड-19 चाचण्या करणारा युएई पहिला देश ठरला आहे. युएईने कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 1 कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत. तर युएईची लोकसंख्या 96 लाखच आहे.
परंतु सर्वाधिक चाचण्यांप्रकरणी चीन अग्रस्थानी आहे. अमेरिकेने 11 कोटीहून अधिक कोविड चाचण्या केल्या आहेत. अमेरिकेनंतर भारत तिसऱया स्थानावर आहे. चौथ्या स्थानी रशिया असून त्याने 5 कोटी चाचण्या केल्या आहेत.
युएईने मागील काही दिवसांमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविले आहे. हे प्रमाण मागील आठवडय़ाच्या तुलनेत 8 टक्के अधिक आहे. तर याच कालावधीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर बरे होण्याचे प्रमाण 23 टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती युएई सरकारचे अधिकृत प्रवक्ते डॉ. उमर अल हम्मादी यांनी दिली आहे. युएईत आता कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. युएईत कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 436 जणांना जीव गमवावा लागल्याचे डॉक्टर उमर म्हणाले.
लस अद्याप अंतिम चाचणीच्या टप्प्यात आहे. यात स्वयंसेवकांची पूर्ण देखरेख केली जाईल आणि सर्व पैलूंची तपासणी करण्यात येणार आहे. समाजमाध्यमांवरील चर्चेच्या उलट लसीचा डोस घेणाऱया स्वयंसेवकांना खबरदारी बाळगावी लागणार असल्याचे युएईच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.
युएईच्या पंतप्रधानांनी तसेच मंत्र्यांनी कोरोनावरील लस घेतली आहे. पुढील काळात ही लस सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.