वृत्तसंस्था/ मेलबर्न
2022 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचा टेनिसपटू युकी भांब्रीचे मेलबर्नमध्ये आगमन झाले आहे. 2018 नंतर युकी आता पहिल्याच ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत भाग घेत आहे.
गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी अखेरीस भांब्रीने एटीपी टूरवरील स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविताना दोन स्पर्धा खेळल्या. दुखापतीमुळे 2019 आणि 2020 ही दोन वर्षे तो टेनिस हंगामापासून अलिप्त राहिला होता. गेल्या एप्रिल महिन्यात भांब्रीला कोरोनाची बाधा झाली होती. कोरोनातून पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला पुन्हा उजव्या गुडघ्याच्या दुखापतीने जायबंदी केले होते. 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या एकेरी मानांकन यादीत भांब्रीने पहिल्या 100 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले होते. भांब्रीने युवा ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते. 2018 च्या ऑक्टोबर महिन्यात भांब्रीने आपली शेवटची एटीपी स्पर्धा खेळली होती. 2022 च्या ऑगस्टपर्यंत भांब्री 12 विविध स्पर्धामध्ये भाग घेणार आहे. मेलबर्नमध्ये होणाऱया 2022 च्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये स्थान मिळविण्यासाठी भांब्रीला पात्र फेरीच्या स्पर्धेत खेळावे लागणार आहे.