ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध महिनाभराहून अधिक काळ रेंगाळलं आहे. रशिया दररोज युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य करत आहे. मात्र, रशियाच्या तुलनेत कमकुवत असलेल्या युक्रेनच्या सैन्याने रशियन सैन्याला कडवी लढत दिली आहे. आज युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या बेलगोरोड शहरावर एअरस्ट्राईक करत तेल डेपो उडवला.
रशियातील प्रादेशिक गव्हर्नर व्याचेस्लाव ग्लाडकोव्ह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे बेलगोरोड शहर युक्रेनच्या सीमेपासून 25 किमी अंतरावर आहे. शुक्रवारी सकाळी युक्रेनच्या दोन हेलिकॉप्टर्सने बेलगोरोडमधील तेल डेपोवर हल्ला केला. त्यामुळे तेल डेपोला भीषण आग लागली. यात दोन कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं. दरम्यान,युक्रेन सरकारनं अद्याप तरी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.