वृत्तसंस्था/ माँटेरी, मेक्सिको
युक्रेनची अव्वल मानांकित टेनिसपटू एलिना स्विटोलिनाने रशियाच्या ऍनास्तेशिया पोटापोव्हाचा पराभव करून डब्ल्यूटीए माँटेरी टेनिस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत स्थान मिळविले. त्याआधी तिने रशियन खेळाडूविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.
रशियाने तिची मायभूमी युक्रेनवर आक्रमण केले असून त्याच्या निषेधार्थ त्रयस्थ खेळाडूच्या बॅनरखाली न खेळणाऱया रशियन व बेलारुसच्या खेळाडूंविरुद्ध यापुढे खेळणार नसल्याचे स्विटोलिनाने सोमवारी म्हटले होते. मंगळवारी एटीपी व डब्ल्यूटीए यांनी तिची मागणी मान्य करीत निवेदन जारी केल्यानंतर तिने पहिल्या सामन्यावर बष्हिकार टाकण्याचा निर्णय मागे घेतला. या सामन्यात जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानावर असणाऱया स्विटोलिनाने पोटापोव्हाचा 6-2, 6-1 असा धुव्वा उडविला. या सामन्यावेळी तिने पिवळा टॉप व निळा स्कर्ट परिधान केला होता, त्यांच्या राष्ट्रध्वजाचे हे रंग आहेत. ‘मी खरे तर दुखी मनोवस्थेत आहे, तरीही हा माझ्यासाठी खास ठरलेला सामना जिंकल्याचा आनंद वाटतो. आपल्या देशासाठी एक मिशन समजून मी हा सामना खेळला,’ असे ती म्हणाली. येथील स्पर्धेत झालेली आपली सर्व कमाई ती युक्रेनच्या सैनिकांना देणार असल्याचे तिने जाहीर केले आहे.