पोलंडमध्ये सर्वाधिक शरणार्थी
रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात आल्यावर युरोपमध्ये शरणार्थींचा पूर आला आहे. याचा प्रभाव युक्रेनियन मुलांवरही पडला आहे. युद्धाच्या प्रारंभापासून आतापर्यंत कमीत कमी 38 लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून स्थलांतर केले आहे. यात महिला आणि मुलांचे प्रमाण 90 टक्के असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात म्हटले गेले आहे.
सर्वाधिक शरणार्थी सामावून घेण्याप्रकरणही पोलंड हा जगातील दुसऱया क्रमांकाचा देश ठरला आहे. याप्रकरणी तुर्कस्तान पहिल्या स्थानावर आहे. 30 लाखांहून अधिक युक्रेनियन नागरिक सुरक्षित आश्रयाच्या शोधात युरोप आणि जगभरातील देशांमध्ये पोहोचले आहेत.
युक्रेनच्या शरणार्थींसाठी पोलंडची राजधानी वॉर्सा शहर प्रमुख ठिकाण ठरले आहे. वॉर्सामध्ये ट्रान्झिट हब मागील काही आठवडय़ांपासून सातत्याने लाखो लोकांना अन्यत्र हलविण्याचे काम करत आहे. युक्रेनचे नागरिक अन्य युरोपीय देशांमध्ये जाण्यासाठी बस आणि रेल्वेची सुविधा वॉर्सामधून मिळवत आहेत.
रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनचे 30 लाखांहून अधिक नागरिक देश सोडून बाहेर पडले आहेत. यातील 20 लाख प्रथम पोलंडमध्ये पोहोचले आणि त्यानंतर पुढील मार्ग स्वीकारण्याचा पर्याय त्यांनी निवडला आहे. पोलंड आणि युक्रेन यांच्यात 300 मैलाहून अधिक लांबीची सीमा आहे. अशा स्थितीत युक्रेनियन शरणार्थींसाठी पोलंड पहिले ठिकाण ठरले आहे. परंतु पोलंडने सीरिया आणि लीबियाच्या शरणार्थींसाठी स्वतःचे दरवाजे उघडले नव्हते. परंतु युक्रेनियन शरणार्थींकरता पोलंडने अत्यंत सक्रीयपणे भूमिका बजावली आहे.
वॉर्सामध्ये लाखाहून अधिक शरणार्थी
18 लाख लोकसंख्या असलेल्या वॉर्सा शहरात सध्या लाखाहून अधिक शरणार्थींनी आश्रय घेतला आहे. अशाप्रकारे शहराची लोकसंख्या सुमारे 16 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. एवढय़ा मोठय़ा संख्येत शरणार्थींना सामावल्यावर पोलंड शरणार्थींप्रकरणी जगातील दुसरा मोठा देश ठरला आहे. तुर्कस्तानात 37 लाखांहून अधिक शरणार्थी राहत आहेत. तर कोलंबियामध्ये व्हेनेझुएला संकटानंतर 17 लाख शरणार्थी पोहोचले आहेत.