एके-47 चालविण्याचे घेतेय धडे
शिकण्यासाठी कुठल्याच वयाची मर्यादा नसते. जगभरात अशी अनेक उदाहरण दिसून येतील, ज्यांनी स्वतःच्या जीवनाचा मोठा काळ उलटल्यावर नवनव्या गोष्टी शिकत त्या क्षेत्रात स्वतःचे नाव कमाविले आहे. आता याच यादीत एका 79 वर्षीय आजीचे नाव जोडले गेले आहे.
युक्रेनमध्ये राहणाऱया या वृद्ध महिलेचे नाव वॅलेंत्या कोंसतांत्नोवोस्को असून त्या एके-47 यासारखे आधुनिक आणि धोकादायक शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. या वयात देखील ही महिला असॉल्ट रायफल शिकण्यासाठी शूटिंग रेंजमध्ये जात आहे. या महिलेची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रशियाचे सैन्य युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची भीती व्यक्त होतेय. आता अशा स्थितीत युक्रेनच्या सैन्याने स्वतःच्या नागरिकांना शस्त्रास्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. तसेच सैन्याने सिव्हिलियन कॉम्बॅट ट्रेनिंग देण्यास प्रारंभ केला आहे. ही वृद्ध महिला याच प्रशिक्षणात सामील झाली आहे.
आपण आता रायफल चालविण्यास पूर्णपणे तयार आहे. कुठल्याही स्थितीत शत्रूशी लढू शकते असे वॅलेंत्या यांनी म्हटले आहे. त्यांना हे प्रशिक्षण स्पेशल फोर्सेस युनिट अजोयकडून देण्यात येत आहे. या युनिटकडून युक्रेनच्या नागरिकांना देखील युद्धाभ्यासाचे धडे देण्यात येत आहेत.
वॅलेंत्या यांनी देशाकरता शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. या वृद्ध महिलेचे स्वतःच्या देशाबद्दलचे प्रेम कौतुकास्पद आहे. या संकट काळात ही वृद्ध महिला युक्रेन आणि पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. युक्रेनचे बहुतांश लोक या महिलेला स्वतःचा आदर्श मानत आहेत.