आठ विद्यार्थी सुरक्षित स्थळी : 9 जण अद्याप युक्रेनमध्ये अडकून
प्रतिनिधी /मडगाव, वास्को
युद्धग्रस्त युपेनमध्ये अडकलेली गोव्याची विद्यार्थिनी रुपल गोसावी इतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांसह काल मंगळवारी 1 मार्च रोजी नवी दिल्लीत दाखल झाली. गोवा सदनचे उपनिवासी आयुक्त विकास कांबळे यांनी दिल्लीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचे स्वागत केले. एनआरआय सेलचे नोडल अधिकारी अँथनी डिसोझा व अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी ही माहिती दिली.
दरम्यान रात्री उशिरा रुपल गोसावी हिचे दाबोळी विमानतळावर आगमन झाले. शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी तिचे स्वागत केले. आपण सुखरुपपणे गोव्यात पोहोचल्याबद्दल तिने केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच अधिकारीवर्गाला धन्यवाद दिले आहेत.
अँथनी डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार युपेनमधून आणखी 4 विद्यार्थी रोमानियाला पोहोचले आहेत. त्यात 3 मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. हे चार विद्यार्थी विमानाने भारतात जाण्याची वाट पाहत आहेत. याशिवाय आणखी 4 विद्यार्थिनी हंगेरी येथील बचाव शिबिरात सुखरूप पोहोचल्या असून त्यांना लवकरच भारतात आणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गोव्यातील एकूण 17 विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यातील एकूण आठ विद्यार्थी आत्ता सुरक्षित ठिकाणी पोचले असून अद्याप 9 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांची लवकर सुटका व्हावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीत आहेत.