सर्वसामान्य लोकांनी हाती घेतली बंदूक ः छत अन् रस्त्यांवर तैनात
युद्धाच्या तिसऱया दिवशी रशियाचे सैनिक युक्रेनची राजधानी कीव्हनजीक पोहोचले आहेत. कीव्ह आणि परिसरातील भागांमध्ये युक्रेनचे सैनिक आणि रशियाच्या सैनिकांदरम्यान युद्ध सुरू झाले आहे. रशियाचे सैनिक कुठल्याही क्षणी शहरात दाखल होऊ शकतात असे सांगण्यात येत आहे.
याचदरम्यान कीव्हच्या सुरक्षेसाठी सर्वसामान्य लोकांनी हातात बंदूक घेतली आहे. घर, छत आणि रस्त्यांवर तैनात राहून हे लोक रशियाच्या सैनिकांच्या हालचालींवर नजर ठेवून आहेत. यातील अनेक जण तर दोन दिवसांपासून झोपलेले नाहीत.
बॉम्बनिर्मितीची माहिती
युक्रेनचे नेते आणि संरक्षण मंत्रालय लोकांना युद्धाला न घाबरता सामोरे जाण्याचे आवाहन करत आहेत. याचदरम्यान युक्रेनच्या टीव्हीवर रशियासोबत लढण्यासाठी कशाप्रकारे बॉम्ब तयार करावा आणि कसा वापर करावा हे सांगण्यात येत आहे. कशाप्रकारे स्फोटके तयार केली जाऊ शकतात याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्यात येत आहे.