ऑनलाईन टीम / किव्ह :
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दोन भारतीय विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपला जीव गमावावा लागला आहे. त्यानंतर आता युक्रेनची राजधानी किव्हमध्ये एक भारतीय विद्यार्थी गोळीबारात जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, त्याच्यावर किव्हमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या पोलंडमध्ये उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री व्हीके सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
व्हीके सिंग म्हणाले, रशिया आणि युक्रेन युद्धाची दाहकता पाहता आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना युक्रेनबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. अद्याप हजारो भारतीय विद्यार्थी युक्रेनची राजधानी किव्हसह अन्य शहरांमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना सुखरुप मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकार ऑपरेशन गंगा राबवत आहे. दरम्यान, किव्हमधून पळून जाण्याच्या प्रयत्न करत असताना या विद्यार्थ्यावर गोळी झाडली गेली. त्यानंतर त्याला तात्काळ किव्हमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीयांना बाहेर काढण्याच्या कामावर देखरेख करण्यासाठी युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये विशेष दूत म्हणून पाठवण्यात आलेल्या चार मंत्र्यांपैकी जनरल सिंग हे एक आहेत. त्यांच्यासह हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू हे केंद्रीय मंत्री युक्रेनला लागून असलेल्या देशांमधील स्थलांतराच्या प्रयत्नांवर देखरेख करत आहेत.