वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी अमेरिकन काँग्रेस म्हणजेच तेथील संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित केले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्वतःच्या संबोधनात झेलेन्स्की यांनी अमेरिकेला थेट मदत करण्याची विनंती केली आणि युक्रेनला सध्या अमेरिकेची गरज असल्याचे म्हटले आहे. झेलेन्स्की यांनी या भाषणादरम्यान अमेरिकेला पर्ल हार्बर आणि 11 सप्टेंबर 2001 मधील हल्ल्यांची आठवण करून दिली आहे.
तुम्ही एक मोठय़ा देशाचे नेते आहात. तुम्ही पूर्ण जगाचे नेते व्हावे असे मी इच्छितो. पूर्ण जगाचा नेता होण्याचा अर्थ शांततेचा नेता होणे असल्याचे झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जे बायडेन यांना उद्देशून म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर सर्व खासदारांनी उभे राहून टाळय़ा वाजविल्या आणि झेलेन्स्की यांना अभिवादन केले आहे.
अमेरिकेचा एक महान इतिहास राहिला आहे. अमेरिकेच्या इतिहासात काही अशी पाने राहिली आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही युक्रेनची सद्यस्थिती समजू शकता. आम्हाला अमेरिकेची गरज आहे. तुम्ही पर्ल हार्बरला आठवा, 7 डिसेंबर 1941 रोजीची ती भयानक पहाट, जेव्हा तुमचे आकाश शत्रूच्या विमानांच्या हल्ल्यांमुळे काळे झाले होते. कृपया तो दिवस आठवा. 11 सप्टेंबर 2001 रोजीचा भयानक दिवस आठवा, तेव्हा वाईट शक्तींनी अमेरिकेच्या शहरांना युद्धाचे मैदान करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा निष्पाप लोकांवर हवाई हल्ले झाले, आमचा देश देखील सध्या अशाच काही अनुभवांना तोंड देत असल्याचे जेलेंस्की यांनी अमेरिकेच्या खासदारांना संबोधित करताना म्हटले आहे.
रशियावर निर्बंधांची मागणी
अमेरिकेने रशियाच्या खासदारांवर निर्बंध लादावेत, रशियाकडून होणारी आयात रोखावी असे म्हणत झेलेन्स्की यांनी स्वतःच्या देशात युद्धामुळे झालेले नुकसान आणि विनाशाचा एक मार्मिक व्हिडीओ खासदारांनी खचाखच भरलेल्या सभागृहात दाखविला. आम्हाला अमेरिकेची गरज आहे. मी तुमच्याकडून आणखीन अधिक मदतीची अपेक्षा करत आहे. उत्पन्नापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण शांतता असल्याचे युक्रेनच्या अध्यक्षांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना नमूद केले आहे.
युक्रेनसाठीची मदत वाढणार
झेलेन्स्की यानंतर स्पेनच्या संसदेलाही संबोधित करणार असल्याचे सांगण्यात आले. झेलेन्स्की यांच्या भाषणानंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून युक्रेनला 80 कोटी डॉलर्सच्या सुरक्षा सहाय्याची घोषणा होण्याची अपेक्षा आहे. झेलेन्स्की रशियाविरोधी युद्धानंतर जगभरात नायक म्हणून उदयास आले आहेत.