युद्धाचे ढग अधिक गडद, युरोपमध्ये तणाव, अमेरिकेचा इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रशियाकडून युक्रेनवर आक्रमण केले जाण्याची शक्यता वाढली असल्याने भारताने युक्रेनमधील आपले नागरीक आणि विद्यार्थ्यांना तो देश तात्पुरता सोडण्याची सूचना केली आहे. युक्रेन कायमचे सोडण्याची आवश्यकता नाही. मात्र, सध्याच्या तणावग्रस्त परिस्थितीत स्वतःच्या सुरक्षेसाठी असे करणे योग्य ठरेल, असे भारत सरकारकडून आपल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
युक्रेनमधील भारतीय नागरीकांनी त्यांना उपलब्ध असणारी विमाने, आंतरराष्ट्रीय विमाने किंवा अन्य मार्गांनी युक्रेन सोडावे. वेळेवर आणि सुरक्षितपणे तेथून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हालचाली कराव्यात. ज्या भारतीय नागरीकांनी युक्रेनमध्ये वास्तव्य करणे अत्यावश्यक नाही, त्यांनी तेथून बाहेर पडावे. मात्र, तेथून कायमचे जाण्याची आवश्यकता नसून तणाव निवळल्यानंतर हे नागरीक पुन्हा तेथे जाऊन त्यांची कामे सुरु करु शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जाऊ इच्छिणाऱयांनाही सूचना
जे भारतीय युक्रेममध्ये जाऊ इच्छितात, त्यांनी सध्या तेथे जाणे टाळावे. कारण तेथील परिस्थिती सध्या अनुकूल नाही. तसेच जे भारतीय युक्रेममध्ये रहात आहेत, त्यांनीही आपापली घरे किंवा वास्तव्याची स्थाने सोडून अत्यावश्यक कारण नसेल तर प्रवास करु नये, अशीही महत्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे.
तीन बाजूंना रशिया
युपेन हा देश पूर्वी रशियाचाच भाग होता. 1990 नंतर तो स्वतंत्र झाला. मात्र तो तीन बाजूंनी रशियाने व<sढलेला आहे. या तीन्ही बाजूंवर रशियाने आपले 1,50,000 सैनिक आणि रणगाडे, तसेच क्षेपणास्त्रे नियुक्त केल्याचा आरोप युरोपियन देशांनी केला आहे. रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनमध्ये घुसू शकतो, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडन यांनी अनेकदा दिला आहे.
संघर्ष नेमका कशासाठी
युक्रेन हा पूर्वी रशियाचा भाग होता. रशिया ते युरोप अशी प्रस्तावित नैसर्गिक वायू वाहून नेणारी पाईपलाईन युक्रेनमधून जाते. त्यामुळे युक्रेनने आपल्या गटात असावे अशी रशियाची इच्छा आहे. तर हा देश नाटोमध्ये सहभागी करुन घेण्याची युरोप आणि अमेरिकेची इच्छा आहे. युक्रेनने यासंबंधी सावध भूमिका घेतली आहे. युक्रेनला नाटोचा सदस्य होण्यापासून रोखण्यासाठी रशियाने हा दबाव आणला असून तो प्रत्यक्ष युद्धात परिवर्तित होणार नाही, अशीही चर्चा आहे.
रशियाचा युद्धाभ्यास
रशियाने आपल्या सीमेत तसेच बेलारुसमध्ये मोठय़ा प्रमाणात युद्धाभ्यासाला प्रारंभ केल्याने तणाव वाढल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. रशियाने गेले दोन दिवस अण्वस्त्रांचा युद्धभ्यासही केल्याने अमेरिका व युरोपियन देशांनी तीव्र चिंता आणि संताप व्यक्त केला असून रशियाचा अण्विक युद्धाभ्यास हे केवळ दबावतंत्र असून परिस्थती तेथपर्यंत जाणार नाही, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला.