रशिया सीमेवर तैनातीसाठी अमेरिकेचे 8500 सैनिक सज्ज : ब्रिटनकडून पुतीन यांना धमकी
वृत्तसंस्था/ कीव्ह
रशिया आणि युक्रेनदरम्यान युद्धाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. ही स्थिती पाहता अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने 8500 सैनिकांना पूर्व युरोपमध्ये तैनात करण्यासाठी ‘हाय अलर्ट’वर ठेवले आहे. सैनिकांमध्ये कॉम्बॅट टीम, हेल्थ वर्कर्स, इंटेलिजेन्स आणि सर्व्हिलान्स टीमचे सदस्य सामील असल्याची माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी दिली आहे.
अद्याप या सैनिकांना तैनात करण्यासाठी कुठलाच आदेश देण्यात आलेला नाही. तसेच त्यांना कुठलीच जबाबदारी सोपविलेली नाही. परंतु पूर्व युरोपमध्ये नाटोला मजबूत करण्यासाठी अमेरिकेच्या सैनिकांना तैनात केले जाऊ शकते. युरोपमध्ये अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय नाटोकडून घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
जॉन्सन यांचा इशारा
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना युक्रेनवर हल्ल्याच्या स्थितीत गंभीर परिणाम भोगण्याचा इशारा दिला आहे. रशियाच्या सैन्याकडून फेब्रुवारीमध्ये आयर्लंडच्या किनाऱयापासून 150 मैल अंतरावर सागरी युद्धाभ्यास करण्याच्या घोषणेनंतर जॉन्सन यांनी हा इशारा दिला आहे. रशियाने अटलांटिक, प्रशांत, भूमध्य सागर आणि उत्तर सागरात स्वतःच्या 140 युद्धनौकांसह युद्धाभ्यासाची घोषणा केली आहे.
संवादातून टाळा संकट
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुतेरेस यांनी युक्रेन आणि रशियामधील तणाव कमी करण्यासाठी राजकीय संवाद सुरू करण्याचे आवाहन केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ दोन्ही देशांदरम्यान युद्धाऐवजी चर्चेद्वारे मुद्दे निकाली काढले जावेत असे इच्छितो. युद्धाची स्थिती संपवून सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी लवकर पावले उचलावीत असे आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी केले आहे.
ब्रिटनकडून संरक्षणसहाय्य
रशियाच्या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी ब्रिटनने युक्रेनला मोठय़ा संख्येत अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रs आणि अँग्लो-स्वीडिश रणगाडाविरोधी दिशानिर्देशित क्षेपणास्त्रs सोपविली आहेत. रशियाकडून युक्रेनच्या सीमेवर सर्वप्रथम रणगाडय़ांद्वारे हल्ला होण्याची शक्यता आहे. नाटोनुसार रशियाने युक्रेनच्या सीमेवर स्वतःचे सुमारे 8 हजार रणगाडे तैनात केले आहेत. रशियाने युक्रेन सीमेवर 36 इस्कँडर क्षेपणास्त्र प्रक्षेपकही तैनात केले आहेत.