प्रस्तावाला महासंघाची त्वरित मान्यता, लवकरच प्रत्यक्ष निर्णय, रशियाविरोधात एकत्र येण्याची तयारी
कीव्ह / वृत्तसंस्था
युरोपियन महासंघात प्रवेश द्यावा, ही युक्रेनची मागणी महासंघाने एकमुखाने मान्य केली आहे. त्यामुळे लवकरच त्याचा समावेश होणार आहे. अवघ्या दोन दिवसांमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे रशियासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रशियाविरोधात एकत्रित संघर्ष करण्यासाठी महासंघ सज्ज होत असल्याची सूत्रांची माहिती आहे. युद्धाची व्याप्ती वाढण्याची लक्षणे आहेत.
कोणत्याही परिस्थितीत येत्या 24 तासांमध्ये कीव्ह सोडा अशी निर्वाणीची सूचना भारताने आपल्या तेथील नागरीकांना आणि विद्यार्थ्यांना केली आहे. रशियाची सेना युक्रेनची राजधानी कीव्हच्या अगदी जवळ, म्हणजे 26 किलोमीटरवर पोहचली आहे. सैनिक, रणगाडे आणि चिलखती गाडय़ा कीव्हच्या जास्तीत जास्त जवळ नेण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. परिणामी भारतीय नागरीकांनी आता तेथे राहणे धोक्याचे आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
पुन्हा बोलणी होणार
युक्रेन आणि रशिया यांच्यात पुन्हा शांततेसाठी चर्चा होणार आहे. बुधवारी तिचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारची चर्चा अपयशी ठरली होती. रशियाने सर्व सैनिक मागे घ्यावेत अशी मागणी युक्रेनने केली होती. तर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोलताना पुतीन यांनी शांततेसाठी 3 अटी ठेवल्या होत्या. तथापि, तोडगा न निघाल्याने युद्ध पुढे चालू राहिले आहे.
जर्मनीची रशियावर टीका
जर्मनीनेही रशियाशी दोन हात करण्याची तयारी असल्याचा इशारा दिला आहे. आम्ही युक्रेनच्या सोबत असून रशियाने या देशातील सर्व सैन्य हटवावे. रशियाला हे करावेच लागेल, असा इशारा जर्मनीने दिला. युक्रेनला अर्थसाहाय्य आणि शस्त्रसाहाय्यही पुरविण्याची तयारी युरोपातील काही देशांनी केली आहे.
युक्रेनकडून दबाव
आम्ही धोका पत्करुन युरोपियन महासंघात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रशिया संतप्त झाला असून आमचा धोका अधिकच वाढला आहे. अशा स्थितीत युरोपियन महासंघाने आमच्या पाठीशी सक्रीयरित्या उभे राहणे आवश्यक आहे. आमची हानी झाल्यास ती युरोपचीही हानी असेल, असे युपेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्या वक्तव्यात स्पष्ट केल्याने महासंघावरील दबाव वाढला आहे.
रशियाची आगेकूच
रशियाने युक्रेनमध्ये खोलवर मुसंडी मारली असून राजधानी कीव्हच्या जवळ सैनिक आणले आहेत, रणगाडे, चिलखती गाडय़ा आणि इतर वाहनांची 65 किलोमीटर लांबीची रांग कीव्हच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे. आणखी एक दोन दिवसांमध्ये प्रतिकार झाला नाही, तर राजधानी रशियाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे. कीव्ह ताब्यात घेऊन रशिया तेथे बाहुले सरकार स्थापन करेल, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. तसे झाल्यास युरोपियन महासंघ किंवा अमेरिका यांना हालचार करणे कठीण होईल, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
भारताची लगबग
आपल्या नागरीकांना सुरक्षितणे युक्रेनमधून बाहेर काढण्यावर भारताचा भर असून त्यासाठी वायुदलाची सी-17 ही विमाने उपयोगात आणण्यात येणार आहेत. युक्रेनला लागून असणाऱया रोमानिया, पोलंड आणि हंगेरी या देशांमध्ये भारतीयांनी जावे. तेथून त्यांना भारतात आणण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. वायुदलाने विमाने सज्ज ठेवली असून येत्या दोन तीन दिवसांमध्ये हे अभियान सुरु होईल. अद्याप तेथे 18 हजार भारतीय अडकलेले आहेत.
युक्रेनच्या वस्त्यांवर हल्ले
युक्रेनमधल्या खार्कीव्ह या शहरात मानवी वस्त्यांवर रशियन विमानांमधून बाँबहल्ले होत आहेत. मंगळवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 9 वाजता झालेल्या हल्ल्यात 8 नागरीकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला. राजधानी कीव्ह येथे टीव्ही टॉवर आणि वीज पुरवठा केंद्रांवर हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक भागांमध्ये वीज गेली आहे. अनेक इमारती नष्ट झाल्या असून वित्त हानी प्रचंड प्रमाणात झाली. युद्ध लवकर न थांबल्यास युक्रेन आर्थिकदृष्टय़ा 10 वर्षे मागे जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. युक्रेनमध्ये टीव्ही प्रसारणही थांबले आहे.