कंटेंट क्रिएटर्सच्या अडचणी वाढल्या- कंपनीकडून नवा नियम
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
तुम्हीही युटय़ूबच्या माध्यमातून कमाई प्राप्त करत असाल तर हे वृत्त विशेषकरून तुमच्यासाठीच आहे. युटय़ूबद्वारे चित्रफित तयार करून चांगली कमाई करणारे अनेक लोक सद्यकाळात दिसून येतात. अशा लोकांना आतापर्यंत कुठलीच चिंता नव्हती, पण गुगलने आता युटय़ूबर्सना ईमेल पाठवून इशारा दिला आहे. युटय़ूबने अमेरिकेच्या बाहेर राहत असलेल्या युटय़ूबर्सना देयकातील (पेमेंट) बदलासंबंधी कळविले आहे. गुगलला आता सर्व प्लॅटफॉर्म्सवरून अमेरिकेसाठी कर वसूल करावा लागणार आहे. अमेरिकेत राहत नसलेल्या कंटेंट क्रिएटर्सकडूनही कर वसूल करण्यात येणार आहे.
गुगल यंदापासून अमेरिकेच्या बाहेरील क्रिएटर्सकडून कर वसूल करणार आहे. पुढील काही आठवडय़ांमध्येच कराची योग्य रक्कम निश्चित करण्यासाठी ऍडसेन्स अकौंटमध्ये कर विवरण सादर करण्यास गुगलकडून सांगण्यात येणर आहे. 31 मेपर्यंत हे विवरण सादर न केल्यास गुगल संबंधिताच्या कमाईतून 24 टक्के दराने कर आकारण्यात येऊ शकतो. हा नियम केवळ अमेरिकेच्या बाहेर राहत असलेल्या क्रिएटर्सवर लागू होणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या युटय़ुबर्सवर याचा कुठलाच प्रभाव पडणार नाही. कंपनीकडून हा कर जून 2021 पासून आकारला जाण्याची शक्यता आहे.
या कमाईच्या रकमेत जाहिरात आणि अमेरिकेच्या वापरकर्त्यांकडून कमाविण्यात आलेले पैसेही सामील असल्याचे वापरकर्त्याला समजून घ्यावे लागणार आहे. या यादीत गुगलने युटय़ूब प्रीमियम, सुपरचॅट, सुपर स्टीकर्स आणि चॅनल मेंबरशिप्स यासारख्या गोष्टी सामील केल्या आहेत. एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या कराचे पूर्ण विवरण उपलब्ध केल्यास त्याला अमेरिकेबाहेरील प्रेक्षकांसाठी कर भरावा लागणार नसल्याचे कंपनीकडून म्हटले गेले आहे.
युएस टॅक्स नियम
या नियमानुसार व्यक्तीने स्वतःच्या कराची माहिती न दिल्यास त्याला स्वतःच्या कमाईचा 24 टक्क्यांचा हिस्सा कंपनीला द्यावा लागणार आहे. पण क्रिएटरने कराची माहिती दिल्यास त्याला ‘ट्रीटी बेनिफिट’ देण्यात येणार आहे. यांतर्गत क्रिएटर्सना अमेरिकन ह्युअर्ससाठी 15 टक्क्यांचा कर भरावा लागणार आहे. ज्यांच्या मदतीने कमाई केली अशाच ह्युअर्सचा यात समावेश असेल. क्रिएटर्सना हा कर केवळ अमेरिकन प्रेक्षकांच्या आधारावरच द्यावा लागणार आहे.
भारतातील क्रिएटर्स
एखादा क्रिएटर 1 हजार डॉलर्सची कमाई करत असेल आणि यातील 100 डॉलर्स अमेरिकन प्रेक्षकांकडून कमाविण्यात आल्यास त्याला 240 डॉलर्सचा कर भरावा लागणार आहे. कराची माहिती उपलब्ध न केल्यास ही स्थिती ओढवणार आहे. अशा स्थितीत क्रिएटर्ससाठी हे अत्यंत अवघड ठरणार आहे कारण अमेरिकेच्या तुलनेत भारतीय वापरकर्त्यांना खूपच कमी पैसे दिले जातात.
विविध देशांमध्ये वेगळे नियम
युटय़ूबचा हा नियम विविध देशांसाठी वेगवेगळय़ा प्रकारचा आहे. संबंधित देशाचा अमेरिकेसोबत कर विषयक करार आहे की नाही यावर गुगलच्या कराचा नियम अवलंबून आहे. भारताप्रकरणी संबंधिताने कराची माहिती दिल्यास आणि कर कराराचा दतावा केल्यास अमेरिकेच्या प्रेक्षकांकडून मिळणाऱया ह्युजवर त्याचा कर 15 टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. पण एखाद्या क्रिएटर्सने कराची माहिती दिली आणि अमेरिकेसोबत त्याच्या देशाचा कर विषयक करार नसल्यास त्याला अमेरिकेच्या प्रेक्षकांकडून प्राप्त कमाईवर 30 टक्क्यापर्यंतचा कर द्यावा लागणार आहे.
क्रिएटर्सकडून टीका
अनेक क्रिएटर्सनी युटय़ूबच्या कर आकारणीच्या निर्णयावर टीका केली आहे. कंपनी पूर्वीच उत्पन्नातून स्वतःची हिस्सेदारी मिळवत आहे, मग वेगळा कर का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. युटय़ूबच्या या निर्णयाचा फटका छोटय़ा क्रिएटर्सना बसू शकतो.