राष्ट्रवादीकडून काँग्रेसला निर्वाणीचा इशारा : अन्यथा स्वतंत्रपणे पुढे जाणार : प्रफुल्ल पटेल
प्रतिनिधी /पणजी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत युती करण्यासाठी काँग्रेस पक्षाला 15 दिवसांची मुदत दिली असून त्या मुदतीत काँग्रेसने काय ते ठरवावे आणि कळवावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसने थांबू नये आणि आम्ही देखील थांबणार नाही, असेही बजावले आहे.
पंधरा दिवसांच्या मुदतीत जर काँग्रेसने काही प्रतिसाद दिला नाही तर मग आम्हाला स्वतंत्रपणे पुढे जाण्याचा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. गोव्यातील विधानसभा निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून तसे एकत्र यावे, असे आवाहनही पटेल यांनी केले आहे.
पंधरा दिवसांत सोक्षमोक्ष लावा
बांबोळी येथील ग्रॅण्ड हयात हॉटेलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पटेल यांनी पुढे सांगितले की, मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाकडे युतीचा हात पुढे केला होता पण काँग्रेसने वेळ काढला. परिणामी शेवटपर्यंत युती होऊ शकली नाही. तसे आता होता कामा नये आणि काँग्रेसने युतीसाठी वेळ काढू नये म्हणून ही मुदत देण्यात आली आहे. येत्या 15 दिवसात काय तो युतीचा सोक्षमोक्ष लावा, असे पटेल यांनी बजावले आहे.
… म्हणून सरकार स्थापण्यात अपयश
मागील निवडणुकीत काँग्रेस – 17, गोवा फॉरवर्ड – 3 व राष्ट्रवादी काँग्रेस – 1 अशा प्रकारे 21 जणांना एकत्र आणून सरकार करण्याचा इरादा होता परंतु दुर्दैवाने तो इरादा सफल झाला नाही. काही गोष्टीसाठी फार वेळ काढण्यात आला आणि सरकार करण्यास अपयश आले, असे पटेल यांनी नमूद केले.
काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष 1999 पासून 2014 पर्यंत एकत्र आहेत. केंद्रात युपीए सरकार असतानाही ते एकत्र होते व त्यानंतर अनेक राज्यातही एकत्र राहिलेले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आहेत. पं. बंगालमध्येही हे दोन्ही पक्ष एकत्र होते याची आठवण पटेल यांनी करुन दिली.
प्रथम युती, नंतर जागांचे बघता येईल गोव्यातील काँग्रेस नेत्यांकडे तसेच दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे युतीची बोलणी चालू आहेत असे संकेत त्यांनी दिले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांची भेट घेतली असून त्यांच्याकडेही युतीची बोलणी केली आहे. युतीसाठी किती जागा मागणार यावर उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. प्रथम युती होऊ द्या, जागांचे नंतर बघता येईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव, गोवा प्रदेश अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा उपस्थित होते.
प्रफुल्ल पटेल यांची सुदिन ढवळीकरांशी चर्चा
माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या बोलाविण्यावरुन मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी त्यांची काल गुरुवारी दुपारी भेट घेतली. त्यांच्या दरम्यान बराच वेळ चर्चा झाली. काँग्रेस पक्षातर्फे आघाडीमध्ये सहभागी व्हा, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी होणार आहे. गोवा फॉरवर्ड देखील सहभागी होईल. मगो पक्षानेही सहभागी व्हावे अशी विनंती त्यांना केली. मात्र मगो पक्षाचे धोरण व तत्व यांचा विचार करता आघाडीत सहभागी होणे मगोला अशक्य असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी कळविल्याचे वृत्त आहे. काही जागांबाबत मगो व काँग्रेसमध्ये केवळ तडजोड होईल. सांखळीमध्ये मात्र सर्व पक्षांतर्फे एकच उमेदवार उभा करण्याच्या प्रस्तावास सुदिन ढवळीकर यांनी पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.