सीमा ओलांडताना हतबल पित्याने सोपविले होती दोन मुले
हंगेरीत मुलांना घेऊन पोहोचली अनोळखी महिला
रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल, तेव्हा किती जण मृत्युमुखी पडले आणि किती नुकसान झाले…कोण कुणाच्या बाजूने होता हेच लिहिले जाईल. परंतु मानवी संस्कृतीच्या डोळे पाणावणाऱया अनेक किस्स्यांबद्दल लोक अज्ञात असतील. अलिकडेच युद्धादरम्यान युक्रेन सीमेवर एक भावुक करणारी घटना समोर आली आहे. तेथे एका महिलेने काही मिनिटांपूर्वी भेटलेल्या एका व्यक्तीच्या मुलांचा हात पकडला आणि त्यांना युद्धाच्या संकटापासून दूर सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.
नतालिया एब्लियेवा शनिवारी युक्रेनची सीमा ओलांडत असताना एका अनोळखी युक्रेनियन व्यक्तीला भेटली. तो स्वतःच्या मुलाला आणि मुलीला घेऊन पोहोचला होता. त्याला सैनिकांनी युक्रेन ओलांडण्याची अनुमती दिली नव्हती. युक्रेन सरकारने 18-60 वयोगटातील सर्व पुरुषांना देश सोडण्यास मज्जाव केला आहे. नतालियाने दोन्ही मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडणाऱया पित्याचे दुःख जाणले. त्यानंतर दोन्ही मुलांचा हात पकडून त्या हंगेरीत पोहोचल्या. जेथे ही मुले स्वतःच्या आईच्या प्रतीक्षेत शरणार्थींसाठी निर्मित शिबिरात बसून राहिले.
आईशी बोलताच पाणावले डोळे
स्वतःच्या मुलांना माझ्या स्वाधीन करून एका पित्याने माझ्यावर विश्वास दाखविला. त्यांचे पासपोर्टही माझ्याकडे दिले. यापूर्वी या मुलांना मी कधीच भेटले नव्हते. त्यांच्या पित्याने मुलांच्या आईचा फोन क्रमांक दिला होता. त्यांची आई इटलीत भेटणार असे त्यांनी सांगितले होते असे 58 वर्षीय नतालिया यांननी नमूद केले आहे. मुलांना आईने फोन केल्यावर त्यांच्या डोळय़ातून अश्रूंनी वाट मोकळी केली. आई एना सेम्युक तेथे पोहोचल्या आणि त्यांना मुलांना कडकडून मिठी मारली. तसेच नतालिया यांचे आभार मानले. काळासोबत सर्वकाही नीट होईल. एक किंवा दोन आठवडय़ांनी घरी परतू एवढेच मी माझ्या मुलांना सांगू शकते असे एना म्हणाल्या.
घर तुटले, हिंमत नाही
सोशल मीडियावर युक्रेनचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. यात एक युक्रेनियन महिला बॉम्बवर्षावानंतर स्वतःच्या घरातील ढिगारा साफ करताना दिसून येते. महिलेच्या डोळय़ात अश्रू होते, परंतु तोंडात युक्रेनचे राष्ट्रगीत होते. खिडकीच्या तुटलेल्या काचा उचलताना महिला राष्ट्रगीत म्हणत होती.