सिलिंडरमागे 50 रुपये वाढ, पेट्रोल-डिझेलही 80 पैसे महाग
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या 137 दिवसांमध्ये न करण्यात आलेली पेट्रोल-डिझेलची दरवाढ मंगळवारी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकाच्या विनाअनुदान गॅस सिलिंडरचा दरही 50 रुपये अधिक झाला आहे. युपेन-रशिया युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर मोठय़ा प्रमाणात वाढल्याने ही दरवाढ अटळ होती, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2021 म्हणजे दिवाळीच्या आधी एक दिवस पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात 5 रुपये प्रतिलीटर तर डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 प्रतिलीटर कपात केली होती. त्यामुळे 110 रुपयांच्या घरात गेलेले पेट्रोलचे दर कमी झाले होते. ही स्थिती 137 दिवस टिकून राहिली. या कालावधीमध्ये दरवाढ करण्यात आली नव्हती. आता पुन्हा ती करण्यात आली आहे.
अंदाज होताच
विधानसभा निवडणुकांच्या नंतर पेट्रोल-डिझेलची दरवाढ त्वरित केली जाईल असा अंदाज होता. तथापि, तसे झाले नाही. विधानसभा निवडणुकांची मतगणना झाल्यानंतर 12 दिवसांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाढीचा अंदाज काहीसा उशीरा खरा ठरला आहे.
प्रत्येक निवडणुकीचा अनुभव
कोणत्याही मोठय़ा निवडणुकीआधी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले जातात आणि नंतर ते वाढविले जातात, हा अनुभव याहीवेळा आला. पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये 2021 मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्याहीवेळी निवडणुकीच्या आधी काही दिवस दर स्थिर करण्यात आले. मतगणना झाल्यानंतर वाढविण्यात आले. 2020 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आधी असेच घडले होते. 2019 च्या लोकसभा निवणुकीआधी हे दर स्थिर ठेवण्यात आले होते. मे 2019 मध्ये मतगणना झाल्यानंतर ते काहेसे वाढविण्यात आले होते.
दुप्पट झाल्यानंतरही दरवाढ नाही
रशिया युद्ध सुरु झाल्यानंतर कच्च्या इंधन तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. 60 डॉलर्स प्रतिबॅरल असणारा दर 120 डॉलर्सच्याही पुढे गेला. तरीही काही दिवस दरवाढ तटवून ठेवण्यात आली होती. आता दर पुन्हा वाढू लागले आहेत. भारताला आपल्या आवश्यकतेच्या 85 टक्के इतक्या मोठय़ा प्रमाणात कच्चे इंधन तेल आयात करावे लागते. भारताची कच्च्या तेलाची आवश्यकता प्रतिदिन 45 लाख बॅरल इतकी आहे. सध्याच्या भावाने त्याची किंमत 50 कोटी डॉलर्स प्रतिदिनहून अधिक होते. सध्याच्या काळात कच्च्या इंधन तेलाचे दर वाजवीपेक्षा खूपच अधिक वाढल्याने पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणे अनैसर्गिक मानता येणार नाही असे मत काही तेलतज्ञांनीही व्यक्त केले आहेत.
गॅसची किंमत दुप्पट
गेल्या आठ वर्षांमध्ये स्वयंपाकाच्या गॅसची किंमत जवळपास दुपटीपेक्षाही जास्त झाली आहे. मार्च 2014 मध्ये ती दिल्लीत 410.50 रुपये होती. ती आता 949 रुपये झाली आहे. 2004 च्या मार्चमध्ये गॅसची किंमत 241.60 रुपये प्रतिसिलिंडर होती. म्हणजे ती त्यानंतरच्या 10 वर्षांमध्ये जवळपास दुप्पट झाली होती. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर साधारणतः 10 वर्षांनी आधीच्या दुप्पट होतात असा अनुभव आहे. याहीवेळी हीच परंपरा साधारणतः कायम राहिली आहे.
विरोधी पक्षांचा सभात्याग
इंधन तेलाच्या दरवाढीचा प्रश्न विरोधी पक्षांनी संसदेत उपस्थित केला. ही दरवाढ मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. राज्यसभेतील काँगेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टीका केली. प्रश्नोत्तर काळात लोकसभेत काँगेस नेते अधीररंजन चौधरी यांनीही हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर काही पक्षांच्या सदस्यांनी दरवाढीचा निषेध करण्यासाठी संसदेतून सभात्यागही केला.