पुतीनविरोधी मॉडेलचा सुटकेसमध्ये मिळाला मृतदेह
रशियन मॉडेल ग्रेटा वेडलरचा मृतदेह एका सुटकेसमधून हस्तगत झाला आहे. 23 वर्षीय ग्रेटा वर्षभरापासून बेपत्ता होती, परंतु तिचे सोशल मीडिया अकौंट सक्रीय होते. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना मनोरुग्ण संबोधिल्यावर ग्रेटा चर्चेत आली होती.
ग्रेटाची हत्या केल्याची कबुली तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर दिमित्री कोरोविनने दिली आहे. कोरोविनने गळा आवळून तिचा जीव घेतला आणि मृतदेह सुटकेसमधून तो कारच्या डिक्कीत ठेवला होता. 300 मैल अंतराचा प्रवास करून त्याने ग्रेटाचा मृतदेह लिपेट्स्क येथे कारमध्येच सोडून दिला होता.
ग्रेटाची हत्या पैशांच्या वादातून केल्याचा दावा दिमित्रीने केला आहे. या हत्येचा ग्रेटाच्या राजकीय भूमिकेशी कुठलाच संबंध नसल्याचे रशियाच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात येत आहे. ग्रेटाच्या मृत्यूनंतर कोरोविन तिचे सोशल मीडिया पेज अपडेट करत होता. सध्या गेटाच्या या माजी प्रियकराने हत्येचा गुन्हा कबूल केला आहे.
परंतु युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियन मॉडेल ग्रेटाचा मृतदेह मिळाल्याने अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. रशियाच्या मॉडेलने एक वर्षापूर्वी पुतीन यांच्यावर जाहीरपणे टीका केली होती. तेव्हापासूनच ती बेपत्ता झाली होती.
मेलितोपोलच्या महापौराची रशियाकडून अखेर मुक्तता
युक्रेनकडून देखील 9 रशियन सैनिकांची सुटका
युक्रेनमधील मेलितोपोल शहराच्या महापौराला रशियाच्या सैन्याने 5 दिवसांपर्यंत ताब्यात ठेवल्यावर मुक्त केले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर जेलेंस्की यांचे चीफ ऑफ स्टाफ अन्द्रsई येरमक यांनी यासंबंधी माहिती दिली असली तरीही महापौराला कशामुळे सोडण्यात आले, याचा खुलासा केला नाही. मागील आठवडय़ात ताब्यात घेण्यात आलेल्या महापौरांना मुक्त करविण्यासाठी युक्रेनने स्वतःच्या ताब्यातील 9 रशियन सैनिकांना सोडल्याचा दावा युक्रेनची वृत्तसंस्था इंटरफॅक्सने एका वरिष्ठ अधिकाऱयाचा दाखला देत केला आहे. अध्यक्ष जेलेंस्की यांच्या कार्यालयाने महापौर इवान फेडोरोव्ह यांची मुक्तता झाल्याचे सांगितले, परंतु यासंबंधी अधिक तपशील देणे टाळले आहे. इवान फेडोरोव्ह यांच्या मुक्ततेच्या बदल्याने युक्रेनने अटकेतील 9 रशियन सैनिकांची सुटका केली आहे. हे सैनिक कमी वयाचे असल्याने त्यांची युक्रेनने मुक्तता केली आहे. मागील शुक्रवारी रशियाच्या सैन्याने फेडोरोव्ह यांचे अपहरण केले होते.
तिच्या नशिबी युद्धाचेच जीवन
सीरियात राहते युक्रेनियन आई-पॅलेस्टिनी पित्याची मुलगी
व्हिक्टोरिया नाजी सीरियात जन्माला आली, तिचे वडिल पॅलेस्टिनी असून आई युक्रेनची आहे. सीरिया, पॅलेस्टाइन आणि युक्रेन या तिन्ही देशांशी एका युवतीचे कनेक्शन पाहता ती युद्ध आणि संघर्षाच्या छायेतच लहानाची मोठी झाल्याचे स्पष्ट होते. नाजी आता 24 वर्षांची असून दमास्कस येथे राहते. सीरियातील युद्धादरम्यान तिने तारुण्यात पदार्पण पेले. या युद्धात सीरिया उद्ध्वस्त झाला आहे. नाजीने अलिकडेच दमास्कस विद्यापीठातून पदवी मिळविली आहे. नोकरीच्या शोधात युक्रेनमध्ये जाण्याचा तिचा विचार होता, परंतु तेथे जाण्यापूर्वीच युद्ध सुरू झाले.
मार्च 2011 मध्ये सीरियात अध्यक्ष बशर अल-असाद विरोधात नागरिक रस्त्यांवर उतरले होते, त्यानंतर गृहयुद्ध सुरू झाले आणि यात हजारो लोक मारले गेले, निम्म्याहून अधिक लोकसंख्येला पलायन करावे लागले. परंतु असाद यांना रशियाचे पाठबळ मिळाल्याने ते सत्ता वाचवू शकले. सीरियातील या उलथापालथीदरम्यान नाजी जगली आहे.
माझे मित्र आणि त्यांच्या कुटुंबीयांना युक्रेनची राजधानी कीव्हमधून जीव वाचविण्यासाठी पलायन करावे लागल्याचे नाजी म्हणाली आणि नाजीच्या आईवडिलांनी 1983 मध्ये विवाह केला होता. दमास्कसमध्ये स्थायिक होण्यापूर्वी हे जोडपे सीरिया आणि युक्रेन दोन्ही ठिकाणी राहत होते. तिन्ही देशांशी संबंध असल्याने आंनदी असायला हवे, परंतु मी यापैकी कुठल्याच देशात मी राहू शकत नाही. आम्ही युद्धाच्या स्थितीत लहानाचे मोठे झालो आहोत. आता या सर्व गोष्टींची जणू सवयच झाल्याचे तिने म्हटले आहे. रशियाविरोधात 8 देशांची आघाडी
ब्रिटन-फ्रान्सचा समावेश : पुतीन यांच्यावर कारवाईच्या तयारीत अमेरिका
रशिया-युक्रेन युद्धाला गुरुवारी 22 दिवस झाले आहेत. रशियाचे सैन्य राजधानी कीव्हच्या अत्यंत नजीक पोहोचले आहे. याचदरम्यान अमेरिकेने रशिया विरोधात मोठे पाऊल उचलत 8 देशांची संघटना तयार केली आहे. या नव्या संघटनेत अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि इटली यांचा समावेश आहे. या 8 देशांमध्ये रशियाच्या अब्जाधीशांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना ‘युद्ध गुन्हेगार’ संबोधिले आहे. बिडेन यांच्या वक्तव्याकडे रशियाच्या विरोधात अमेरिकेच्या भूमिकेत झालेला मोठा बदल म्हणून पाहण्यात येत आहे. अमेरिकेकडून युक्रेनला 600 स्टिंगर अँटीएअरक्राफ्ट क्षेपणास्त्रs आणि 2,600 जॅवलिन अँटीटँक क्षेपणास्त्रs पुरविण्यात आली आहेत. तर नाटोच्या महासचिवाने स्वतःच्या मिलिट्री कमांडर्सना पूर्व युरोपमध्ये अधिक सैन्य तैनात करण्याचा विस्तृत आराखडा तयार करण्यास सांगितले आहे. या कृतीकडे रशियावर दबाव निर्माण करण्याची रणनीति म्हणून पाहण्यात येत आहे. पाश्चिमात्य देशांकडून लादण्यात येणाऱया निर्बंधांच्या प्रत्युत्तरादाखल रशियाने कठोर पाऊल उचलले आहे. रशिया आता अमेरिका आणि युरोपीय कंपन्यांची मालकी हक्क असणारी शेकडो कमर्शियल विमाने जप्त करणार आहे. तर दुसरीकडे रशियाने बुधवारी ब्रिटिश वृत्त संकेतस्थळ बीबीसीवर बंदी घातली आहे.
7 हजार रशियन सैनिकांचा मृत्यू
20 दिवसांच्या लढाईत रशियाने 7 हजारांहून अधिक सैनिक गमावले असून यात तीन जनरल देखील सामील असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे. रशियाचे 14-21 हजारांदरम्यान सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. रशियाच्या सैनिकांचे मनोबल पूर्णपणे तुटले असून ते लढण्याऐवजी वाहन उभे करून हिंडताना दिसून येत असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे.
मुलांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी बॉम्बवर्षाव
रशियाच्या सैन्याचे क्रौर्य : अनेक जणांचा मृत्यू
रशिया आणि युक्रेन युद्धात 22 दिवसांनी देखील क्रौर्य सुरूच आहे. सैन्य तळांवर सुरू झालेले हल्ले आता नागरी वस्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. रशियाच्या सैन्याने बुधवारी रात्री युक्रेनच्या एका थिएटरवर बॉम्बवर्षाव केला असून यात अनेक जण मारले गेल्याची भीती आहे.
मारियुपोल शहराच्या या थिएटरमध्ये अनेक मुलांसह शेकडो लोकांनी आश्रय घेतला होता, अशी माहिती सिटी कौन्सिलने दिली आहे. मारियुपोल नाटय़गृहातील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्याची संख्या समजणे अवघड आहे, कारण नागरी भागांवर रशियाचा बॉम्बवर्षाव अद्याप सुरूच आहे. यामुळे बचाव पथक देखील अडकून पडलेल्या लोकांपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे युक्रेनच्या अधिकाऱयांनी म्हटले आहे.
नाटय़गृह इमारतीच्या समोर आणि मागील बाजूस मोठमोठय़ा अक्षरांमध्ये पांढऱया रंगामध्ये ‘चिल्ड्रन’ असे लिहिले गेले होते. या इमारतीत हवाईहल्ल्यापासून वाचण्यासाठी सुमारे 1200 लोकांनी आश्रय घेतला होता असे मानले जात आहे. रशियाच्या सैन्याने ‘चिल्ड्रन’ या शब्दाकडे डोळेझाक करत या इमारतीवर बॉम्बवर्षाव केला आहे. जाणूनबुजून नागरिकांना लक्ष्य केल्याप्रकरणी रशियाच्या सैन्यावर चहूबाजूने टीका होत आहे.
शहरातील सर्वात मोठे आश्रयगृह
थिएटर ‘संख्या आणि आकारा’च्या दृष्टीकोनातून शहरातील सर्वात मोठे आश्रयगृह होते. तेथे एक हजाराहून अधिक लोक लपले होते, परंतु शहरात सातत्याने होणारा गोळीबार आणि बॉम्बवर्षावामुळे तेथील ढिगाऱयापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी असल्याचे विधान मारियुपोल महापौरांचे सल्लागार पेट्रो एंड्रूशचेंको यांनी केले आहे.
1200 नागरिकांनी या इमारतीत आश्रय घेतला होता, असे युक्रेनच्या अधिकाऱयांचे म्हणणे आहे. तर ह्युमन राइट्स वॉचने थिएटरमध्ये कमीत कमी 500 नागरिकांना सामावता येईल इतपत जागा होती, असे म्हटले आहे. मागील आठवडय़ातील फुटेजमध्ये मोठय़ा संख्येत लोकांनी थिएटरमध्ये आश्रय घेतला असल्याचे दिसून आले, यात प्रामुख्याने महिला आणि मुलांचा समावेश होता.