युद्धातून वाचली, अपघाताने घेतला जीव
5 वर्षीय टासियाला वाहनाची धडक : इटलीत मृत्यू
युक्रेन युद्धादरम्यान पलायन करत इटलीत पोहोचलेल्या एका पाच वर्षीय मुलीचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. एका वाहनाने तिला धडक दिली आहे. या दुर्घटनेत मुलीसोबत एका 16 वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 18 वर्षीय चालकाला अटक केली आहे. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर लाखो नागरिकांनी पलायन केले आहे. यातील टासिया ही आई लुडा आणि कुटुंबीयांसमवेत सुमारे एक महिन्यापूर्वी इटलीत दाखल झाली होती. परंतु आयुष्याने येथे तिची साथ सोडली आहे. दक्षिण इटलीच्या क्रोटोन भागात ही दुर्घटना घडली आहे. टासियाची बहिण स्वतःच्या 16 वर्षीय प्रियकरासह टासियाला सोबत घेऊन बाहेर पडली असता अचानक एका व्हॅनने त्यांना धडक दिली होती. टासिया आणि तिच्या बहिणीच्या प्रियकराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही व्हॅन 18 वर्षांचा युवक चालवत होता.
पोलिसांना हत्येचा संशय
व्हॅनने धडक दिलेल्या 18 वर्षीय युवकाचे टासियाच्या बहिणीच्या प्रियकरासोबत भांडण होते. प्राथमिक चौकशीत ही धडक जाणूनबुजून दिली असावी असे दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोघांनाही मागून धडक देण्यात आली होती.
पुतीन यांच्या सल्लागाराने दिला राजीनामा
पोलंडकून रशियाच्या 45 मुत्सद्यांची हकालपट्टी
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांचे वरिष्ठ सल्लागार एंतोली चुबाइस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एंतोली यांनी युक्रेनवरील आक्रमणाला विरोध केला होता. एंतोली हे 1990 च्या दशकात बोरिस येल्तसिन सरकारमध्ये उपपंतप्रधान राहिले आहेत. दुसरीकडे पोलंडच्या गृह मंत्रालयाने रशियाच्या 45 मुत्सद्यांना देश सोडण्यास सांगितले आहे. या मुत्सद्यांवर रशियाच्या गुप्तचर यंत्रणेसाठी काम करण्याचा आरोप आहे. अमेरिका आणि रशियातील वाप्युद्ध सुरूच आहे. ज्या हेतूने रशियाने युक्रेनसोबत युद्ध सुरू केले होते, तो पूर्ण करण्यास त्याला अपयश आले असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या या दाव्यावर क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी युक्रेन युद्ध आमच्या योजनेनुसार चालले असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्यास आण्विक अस्त्रांचा वापर केला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्ज यांनी पुतीन यांना युक्रेनमध्ये जैविक आणि रासायनिक अस्त्रांचा वापर न करण्याची सूचना केली आहे.
युक्रेनमध्ये रशियाच्या पत्रकाराचा मृत्यू
कीव्हमध्ये रशियाच्या हल्ल्याची बळी ठरली बॉलिना
युक्रेनची राजधानी कीव्हवर बुधवारी झालेल्या रशियाच्या हल्ल्यात रशियन पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. कीव्हच्या पोडोल्स्की जिल्हय़ात रशियाच्या बॉम्बवर्षावात 42 वर्षीय ओक्साना बॉलिना यांना जीव गमवावा लागला. बॉलिना या इन्व्हेस्टिगेटिव्ह न्यूज आउटलेट द इनसाइडरसाठी काम करत होत्या.
हल्ल्यादरम्यान बॉलिनासोबत हजर असलेल्या युक्रेनियन नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. दोघे जण जखमी झाले आहेत. रशियातील विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नी यांच्या भ्रष्टाचारविरोधी समुहासाठी बॉलिना यांनी काम केले होते. मागील वर्षी याच समुहाला उग्रवादी संघटना घोषित करण्यात आल्याने बॉलिना यांना देश सोडावा लागला होता.
भ्रष्टाचार विरोधात वृत्तांकन
बॉलिना रशियातील भ्रष्टाचार विरोधात सातत्याने वृत्तांकन करत होत्या. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्यानंतर बॉलिना यांनी इनसाइडरसाठी कीव्ह आणि लीव्हमधून अनेक घडामोडींचे वृत्तांकन केले होते. इनसाडइरने बॉलिना यांच्या मृत्यूप्रकरणी दुःख व्यक्त केले. युक्रेनमधील युद्धाचे वृत्तांकन सुरूच ठेवणार आहोत, असे इनसाइडरने म्हटले आहे.
सूड घेण्याची शपथ
बॉलिना यांच्यासोबत काम करणारे ब्लादिमीर मिलोव्ह यांनी तिच्या मृत्यूचा सूड घेण्याची शपथ घेतली आहे. बॉलिना यांच्या मृत्यूसाठी जबाबदार लोकांना कधीच विसरणार नसल्याचे ते म्हणाले. नवाल्नी यांच्या समुहातील अन्य प्रमुख सदस्य हुसोव्ह सोबोल यांनी हा हल्ला अत्यंत भयावह असल्याचे म्हटले आहे. युक्रेनियन जर्नलिस्ट युनियनचे प्रमुख सर्गेई टोमिलेंको याहंनी फेसबुकवर बॉलिना यांच्या मृत्यूची पुष्टी देत त्या बॉम्बवर्षावाला बळी पडल्याचे सांगितले आहे.
आतापर्यंत 5 पत्रकारांचा मृत्यू
युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्यादरम्यान आतापर्यंत 5 पत्रकारांचा मृत्यू झाला आहे. यात अमेरिकेतील पत्रकार बेंट रेनॉड, प्रेंच-आयरिश कॅमेरामन पियरे जकर्जवेस्का, युक्रेनियन पत्रकार ऑलेक्झेंड्रा कुवशिनोव्हा यांचा समावेश आहे.
आई, मला मरायचं नाही!
रशियाच्या सैनिकांनी 6 वर्षीय मुलावर झाडल्या 7 गोळय़ा
‘जगात सर्वात अवजड गोष्ट छोटी शवपेटी असते’ अशी म्हण रशिया-युक्रेन युद्धात सत्य ठरताना दिसून येतेय. ‘आई मी मरण्यासाठी खूपच लहान आहे’ असे म्हणणारा निरागस मुलगा रशियाच्या सैन्याने झाडलेल्या 7 गोळय़ा शरीरावर झेलून आईच्या कुशीत पडला होता. 6 वर्षांचा मुलगा ‘मी मरू इच्छित नाही’ असे म्हणत असताना आणि दुसऱयाच क्षणी तो मृतदेहात बदलताना त्या आईची अवस्था काय असेल याचा अंदाज बांधणेही अवघड आहे.
ही वेदनादायी कहाणी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये राहणाऱया एना आणि त्यांच्या मुलाची आहे. रशियाच्या हल्ल्यादरम्यान एना यांनी स्वतःची 13 वर्षांची मुलगी अलीना आणि 6 वर्षीय मुलगा मॅक्सिमसोबत शहर सोडण्याचा निर्णय घेतला होता. एना यांची दोन्ही मुले प्रचंड घाबरली होती. एना यांचा चुलत भाऊ अलेक्झेंडरने त्यांना इरपिनमध्ये राहण्यासाठी बोलाविले होते, परंतु तेथे गोळीबाराचे प्रमाण वाढले होते. अशा स्थितीत दोन्ही कुटुंबांनी एकत्रितपणे शहर सोडण्याचा निर्णय घेतला होता. युक्रेनच्या रेवने शहरातील नातेवाईकांकडे सगळे जण कारने जात होते. काही अंतरावर गोळीबार सुरू झाला आणि यात गाडी चालविणारा अलेक्झेंडर मारला गेला, त्याची पत्नी नताल्याला 10 गोळय़ा लागल्या. एना यांच्या डोक्यात गोळी घुसली होती. अलीनाच्या उजव्या हातात आणि गुडघ्यात गोळी घुसली. मॅक्सिमला मागून 7 गोळय़ा घालण्यात आल्या होत्या. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी त्यांना बोलाविण्यात आले होते.
मॅक्सिमवर अंत्यसंस्कार होत असताना एना यांच्यावर उपचार सुरू होते. एना या दोन्ही मुलांसह कीव्ह शहरामध्ये एका छोटय़ा फ्लॅटमध्ये राहत होत्या. घर चालविण्यासाठी त्या ठिकठिकाणी सफाईचे काम करायच्या.
30 दिवसांत रशियाची 100 लढाऊ विमाने नष्ट
तंत्रज्ञानापेक्षा चतुराई ठरली वरचढ
युक्रेनवर अचानक भीषण हल्ला करून देशावर कब्जा करण्याचा हेतू बाळगलेल्या रशियाला स्वतःच्या या कारवाईत 30 दिवसांनंतरही यश मिळू शकलेले नाही. भूमीवर कब्जा करणे दूरच, रशियाचे सैन्य अद्याप आकाशातही स्वतःचे प्रभुत्व निर्माण करू शकलेले नाही. रशियाची लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांसमोर युक्रेनचा टिकाव लागणे अशक्य मानले जात होते, परंतु युक्रेनची लढाऊ विमाने अद्याप उड्डाणे करत असल्याची स्थिती आहे. युक्रेनने रशियाची 100 हून अधिक लढाऊ विमाने पाडविल्याचा दावा केला आहे.
युद्धाची स्थिती आता आमच्या बाजूने निर्माण होतेय. स्थिती शांततेच्या दिशेने सरकत आहे. प्रारंभी रशिया स्वतःच्या संख्याबळामुळे वरचढ ठरत होता, परंतु आता स्थिती बदलली आहे. आमच्याकडून रशियाची लढाऊ विमाने पाडविली जात असल्याने त्याच्या अनेक वैमानिकांनी उड्डाण करण्यास नकार दिला असल्याचा दावा युक्रेनच्या वायुदलाचे अधिकारी एंद्रीय यांनी केला आहे.
अमेरिकेसोबत युद्धाभ्यास उपयुक्त
रशियाचे वैमानिक अत्याधुनिक लढाऊ विमानांचे उड्डाण करत आहेत. ते अधिक अंतरावरून क्षेपणास्त्रांचा मारा करण्यास सक्षम आहेत. यामुळे आम्ही ही विमाने पाडविण्याच्या प्रक्रियेत असताना त्यांची क्षेपणास्त्रs पोहोचत असतात. या युद्धात अमेरिका आणि नाटोकडून मिळालेले प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. आम्ही अमेरिकेच्या एफ-15 आणि एफ-16 लढाऊ विमानांसोबत काही वर्षांपूर्वी युद्धाभ्यास केला होता. यादरम्यान आम्ही लढाऊ विमान पाडविण्यासाठी काही तंत्रज्ञानांना विकसित केले होते, ज्याचा आता लाभ होतोय, असे एंद्रीय म्हणाले.
पाश्चिमात्य देशांकडून आम्हाला अनेक सुरक्षा प्रणाली मिळाल्याने आम्ही आता सहजपणे उड्डाण करू शकत आहोत. भयभीत रशियाच्या अनेक वैमानिकांनी युद्धात सहभागी होण्यास नकार दिला आहे. युक्रेनने आतापर्यंत 100 हून अधिक रशियन लढाऊ विमाने आणि 123 हेलिकॉप्टर्स नष्ट केली आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
8 वर्षांपासून करत होतो तयारी
रशियाला अद्याप युक्रेनच्या हवाईक्षेत्रावर कब्जा करता आलेला नाही. युक्रेनचे सैन्य अत्यंत चतुराईने स्वतःच्या एअर डिफेन्सचा वापर करत असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी जॉन किर्बी यांनी म्हटले आहे. रशियाकडून हल्ल्याची शक्यता पाहता आम्ही मागील 8 वर्षांपासून तयारी करत होतो. या काळात आम्ही उपलब्ध शस्त्रास्त्रांच्या बळावर कशाप्रकारे रशियाच्या सैन्यावर मात करता येईल हे शिकलो आहोत, असे युक्रेनच्या सैन्याने म्हटले आहे.