अमेरिकेच्या सर्च इंजिनद्वारे पटविली जातेय शत्रूची ओळख
डाटाबेसमध्ये 20 लाख रशियन नागरिकांची छायाचित्रे
युक्रेनने युद्धादरम्यान स्वतःच्या शूत्रंचा चेहरा ओळखण्यासाठी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजेन्स)चा वापर करणे सुरू केले आहे. रशियन हल्लेखोरांची ओळख पटविण्यासाठी युक्रेन क्लिरयह्यू या अमेरिकन कपंनीच्या एआय फेशियल रिकग्निशन सर्च इंजिनची मदत घेत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे युद्धात मारले गेलेले नागरिक आणि सैनिकांची वेगवेगळी ओळख पटविली जाऊ शकते.
युक्रेनचे संरक्षण मंत्रालय शनिवारपासून आमच्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आमच्या डाटाबेसमध्ये एकूण 1 कोटीहून अधिक छायाचित्रे आहेत. यातील 20 लाखांहून अधिक छायाचित्रे रशियन सोशल मीडिया कोंटाक्टेवरून जमविण्यात आली आहेत. आमचे तंत्रज्ञान चेहरा खराब असण्याच्या स्थितीतही अचूक ओळख पटविण्यास उपयुक्त आहे आणि फिंगर प्रिंट मॅचिंगपेक्षाही सोपे असल्याचे क्लियरह्यू कंपनीचे सीईओ होन टन-थाटो यांनी म्हटले आहे.
मोफत पुरविले सर्च इंजिन
क्लियरह्यूच्या तंत्रज्ञानाचा वापर शरणार्थींना त्यांच्या कुटुंबासोबत भेटविण्यासाठी, रशियन हेरांची ओळख पटविणे आणि युद्धाशी संबंधित बनावट सोशल मीडिया पोस्टचा भांडाफोड करण्यासाठी केला जातोय. युक्रेनला क्लियरह्यू एआयच्या सर्च इंजिनच्या वापरासाठी पैसे द्यावे लागणार नाहीत. कंपनीने हे युक्रेनला मोफत उपलब्ध केले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे युक्रेनचे सैन्य तपासणी नाक्यावरच मित्र आणि शत्रूची ओळख पटवू शकणार असल्याचे उद्गार कंपनीचे सल्लागार ली वोलोस्की यांनी काढले आहेत.
तर युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने या दाव्यावर कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. यापूर्वी युक्रेनच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्रालयाच्या प्रवक्त्याने क्लियरह्यू यासारख्या अमेरिकेतील एआय कंपन्यांच्या प्रस्तावावर विचार करत असल्याचे विधान केले होते.
तंत्रज्ञानाचे टीकाकार देखील
एआयची एक चूक कुठल्याही नागरिकाच्या मृत्यूचे कारण ठरू शकते. क्लियरह्यूला कधीच ओळख पटविण्याचा एकमात्र स्रोत म्हणून वापरण्यात येऊ नये असे विधान न्यूयॉर्कमध्ये सर्व्हिलान्स टेक्नोलॉजी ओव्हरसाइट प्रकल्पाचे सीईओ अल्बर्ट फॉक्स यांनी केले आहे. एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर आणि गैरवापर करण्याच्या पद्धतींवर कुठलेच नियंत्रण नसल्यास त्याबाबत अधिक दक्ष राहणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
कंपनीवर आरोप
क्लियरह्यूचे तंत्रज्ञान प्रामुख्याने केवळ अमेरिकेतील कायदा-सुव्यवस्था यंत्रणांना विकले जाते. कंपनीवर खासगीत्व अधिकाराच्या उल्लंघनावरून अमेरिकेत खटला देखील सुरू आहे. यात विनाअनुमती इंटरनेटवरून छायाचित्रे चोरण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. आपण गुगल सर्चप्रमाणेच डाटा एकत्र करतो असे कंपनीचे म्हणणे आहे.